________________
पैशांचा व्यवहार
मुलांना चांगले शिक्षण वगैरे सर्व द्यावे, ते सर्व चांगल्या प्रकारे पूर्ण करून त्यांना कामाला लावले की ते मार्गी लागले. म्हणून त्यांच्यासाठी फार ठेऊ नये. थोडे बँकेत किंवा कुठेतरी ठेवायचे. दहा-वीस हजार, म्हणजे केव्हा तरी तो अडचणीत आला तर त्याला द्यायचे. पण त्याला सांगायचे नाही की मी तुझ्यासाठी ठेवले आहेत. होय, नाहीतर अडचण नसली तरी अडचण उभी करतील.
एक माणसाने मला प्रश्न केला की, 'मुलांना काही द्यायचेच नाही? मी उत्तर दिले, 'मुलांना द्यायचे. आपल्या वडिलांनी आपल्याला जितके दिले असेल ते सर्व द्यायचे. मधली जी मिळकत आहे ती आपली. ती आपल्या मर्जीनुसार धर्मासाठी दानात खर्च करावी.
प्रश्नकर्ता : आमच्या वकिलीच्या कायद्यात सुद्धा असे आहे की जी वडिलोपार्जित प्रोपर्टी(मिळकत) असेल ती मुलांना द्यावीच लागते. आणि स्वोपार्जित आहे, त्याचा वापर वडील स्वतःच्या इच्छेनुसार करू शकतात.
दादाश्री : हो, जे काही करायचे असेल ते आपल्या हातानेच करून घ्यावे! आपला मार्ग काय म्हणतो, की तुझा स्वतःचा जो माल आहे तो माल वेगळा करून तू वापर, तर ते तुझ्यासोबत येईल. कारण हे ज्ञान घेतल्यानंतर अजून एक दोन जन्म बाकी राहतील, म्हणून जवळ काहीतरी असावे ना! परगावी जातो तेव्हा सोबत थोडी शिदोरी घेऊन जातो, तर हे सर्व बरोबर नको का?
प्रश्नकर्ता : पुढच्या जन्मासाठी पुण्य उपार्जन करण्यासाठी या जन्मी काय करायला पाहिजे?
दादाश्री : या जन्मी जो पैसा मिळेल त्याचा पाचवा हिस्सा देव मंदिरात दान करावा किंवा मग लोकांच्या सुखासाठी वापरावा. म्हणजे तेवढा तरी ओव्हरड्राफ्ट तिथे पोहोचेल. हे गेल्या जन्मीचे ओव्हरड्राफ्ट तर आज उपभोगत आहात. या जन्मी पुण्य कराल, ते पुढच्या जन्मी उपयोगात येईल. आजची कमाई पुढे कामास येईल.