________________
१४
पैशांचा व्यवहार
पण तुमची तर अक्कलवान जात, कुठूनतरी हुडकून काढले असेल!' तर म्हणाले 'छे! छे! कुणालाही सोबत नेता येत नाही.' नंतर त्यांच्या मुलाला विचारले की, 'तुमचे वडील तर असे सांगत होते, ' तर तो म्हणतो कसा की, 'सोबत घेऊन जाता येत नाही हेच उत्तम आहे. सोबत घेऊन जाणे जर शक्य असते ना, तर माझे वडील तर फार पक्के आहेत, आमच्या डोक्यावर तीन लाखाचे देणे सोडून जातील असे आहेत. माझ्यासाठी कोट-पॅन्ट सुद्धा राहू देणार नाहीत. आमची तर वाट लावून देतील, असे पक्के आहेत!
प्रश्नकर्ता : मुंबईतील शेठजी दोन नंबरचे पैसे गोळा करीत असतात त्याचा काय इफेक्ट (परिणाम) होतो ?
दादाश्री : त्यामुळे कर्मबंध पडतो. ते पैसे दोन नंबरचे किंवा एक नंबरचेही असतात. म्हणजे खरे, खोटे सर्व पैसे कर्मबंधन करवितात. नाहीतरी कर्मबंधन तर होतच असते. जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत कर्मबंधन होतच असते. दोन नंबरच्या पैशांमुळे वाईट कर्मबंध पडतो. तेव्हा मग जनावरांच्या गतीमध्ये जावे लागते, पशू योनीत जावे लागते. आणखी काही विचारायचे आहे का ?
प्रश्नकर्ता : ही माणसे पैशांच्या मागे धावतात तर त्यांना कधी संतोष का होत नाही ?
दादाश्री : कुणी जर आपणास सांगितले की संतोष राखा, तर आपण म्हणू की बाबा, तुम्ही संतोष ठेवत नाही, आणि मला का बरे सांगायला आलात? वस्तुस्थिती अशी आहे की संतोष आपण ठरवल्याने राहू शकेल असा नाही. त्यात सुद्धा कुणाच्या सांगण्याने संतोष राहू शकेल असे तर नाहीच. संतोषाचे तर असे आहे की जितके ज्ञान असेल त्यानुसार आपोआपच, सहजपणे संतोष राहतोच. संतोष ही करण्यासारखी गोष्ट नव्हे, तो तर परिणाम आहे. तुम्ही जशी परीक्षा दिली असेल तसा परिणाम येईल. त्याचप्रमाणे जितके ज्ञान असेल तितक्या प्रमाणात संतोष राहील. संतोष व्हावा म्हणून तर लोक इतके श्रम करतात ! बघा ना, शौचालयात सुद्धा दोन कामे करतात. दाढी आणि दोन्ही कामे उरकतात! इतका मोठा लोभ असतो ! यालाच तर इंडियन पझल म्हणतात.