________________
दादाश्रींनी कधीही त्याचा स्वीकार केला नाही. दान करण्याची ज्यांची खूपच प्रबळ इच्छा असेल अशा व्यक्तींना लक्ष्मी सन्मार्गी, मंदिरात किंवा लोकांसाठी अन्नदानात वापरण्यास सुचवत असत. आणि ते सुद्धा त्या व्यक्तिच्या ऐपतीची खाजगी माहिती त्याच्याकडून तसेच त्याच्या कुटुंबियांकडून विस्तारपूर्वक मिळवून, त्यात सर्वांची राजीखुशीने सहमती आहे, हे कळल्यानंतरच त्यांना 'होकार' देत असत!
संसार व्यवहारात पूर्णपणे आदर्शपूर्वक राहणारा, संपूर्ण वीतराग पुरुष आजवर या जगात पाहण्यात आला नव्हता, असा पुरुष या काळात जगाला पाहावयास मिळाला. त्यांची वीतराग वाणी जगाला सहजतेने प्राप्त झाली. जीवन व्यवहारात उदर निर्वाहासाठी लक्ष्मीची प्राप्ती अनिवार्य आहे, मग ती नोकरी करून असो किंवा धंदा-व्यवसाय करून असो किंवा अन्य कोणत्याही प्रकारे असो, पण या कलियुगातही व्यवसाय करीत असताना सुद्धा वीतरागांच्या मार्गाने कसे चालता येईल, याचा अचूक मार्ग दादाश्रीनी स्वतःच्या अनुभवाच्या योगे जगापुढे प्रस्तुत केला. लोकांनी कधी पाहिले तर सोडा, पण कधी ऐकलेही नसेल, अशा 'अतुलनीय' भागीदाराचा 'रोल' स्वत:च्या जीवन व्यवहाराद्वारे जगाला दर्शविला. आदर्श शब्द सुद्धा तिथे फार छोटा वाटतो. कारण 'आदर्श' हे तर सामान्य माणसाने आपल्या अनुभवाने ठरवलेली वस्तू आहे. जेव्हा दादाश्रींचे जीवन तर अपवादरुपी आश्चर्य आहे.
व्यापार करत असताना लहान वयापासून, वयाच्या बावीसाव्या वर्षापासून ज्यांच्यासोबत भागीदारीचा धंदा सुरु केला तो त्यांनी शेवटपर्यंत त्यांच्या मुलांसोबत सुद्धा आदर्शपणे निभावला. कॉन्ट्रॅक्टच्या व्यवसायात लाखो रुपये कमावले, पण त्यांचा असा नियम होता की स्वतः जर नॉन मॅट्रीकच्या डिग्रीने नोकरी केली तर किती पगार मिळेल? तर पाचशे किंवा सहाशे. म्हणून तितकेच रुपये घरात आणायचे, बाकीचे पैसे धंद्यातच राहू द्यायचे, जेणेकरून नुकसान प्रसंगी कामी यावे! आणि आयुष्यभर हा नियम त्यांनी अचूकपणे पाळला! भागीदाराच्या मुला-मुलींच्या लग्न प्रसंगी सुद्धा होणारा खर्च त्यांनी फिफ्टी-फिफ्टी (निम्मा) पार्टनरशीपमध्ये केला! अशी आदर्श भागीदारी जगात कुठेही पाहायला मिळेल का?