________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
दुसऱ्यांचे दोषच पाहूच नये, दोष पाहिल्याने तर संसार बिघडतो. स्वत:चेच दोष पाहत राहावे. आपल्याच कर्मांच्या उदयाचे हे फळ आहे! मग बोलण्यासारखे काही उरलेच नाही ना? हे तर सर्व अन्योन्य दोष देतात की 'तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात आणि परत एकाच टेबलावर सोबत बसून जेवतात. असे आतल्या आत वैर बांधले जाते. या वैरामुळेच जग टिकून आहे. म्हणूनच आम्ही सांगितले की, 'समभावे निकाल करा.' जेणे करुन वैर मिटेल.
नाही कोणी दोषी या जगात प्रत्येक कर्माची मुक्ती व्हायला हवी. सासू त्रास देते तेव्हा प्रत्येक वेळी कर्मापासून मुक्ती मिळाली पाहिजे. त्यासाठी आपण काय करावे? तर सासूला निर्दोष पाहिले पाहिजे की यात सासूचा काय दोष? माझ्या कर्मांच्या उदयामुळेच त्या मला भेटल्या. त्या बिचाऱ्या निमित्त आहेत. तर त्या कर्मापासून मुक्ती झाली आणि जर सासूचा दोष पाहिला तर कर्म वाढतील, त्यात मग कोण काय करेल? भगवंत तरी काय करतील?
आपण आपले कर्म बांधले जाणार नाही अशाप्रकारे राहावे. या जगापासून दूर राहावे. पूर्वी कर्म बांधले होते म्हणून तर आता एकत्र आलो आहोत. आपल्या घरात कोण एकत्र आले आहेत? तर ज्यांच्याशी कर्माचे हिशोब बांधले होते तेच सर्व एकत्र आले आहेत, आणि मग ते आपल्याला बांधून मारतात सुद्धा! आपण ठरवले असेल की मला त्याच्याशी बोलायचे नाही, तरीही तो तोंडात बोट घालून बोलण्यास भाग पाडतो. अरे, तोंडात बोट घालून कशाला बोलायला लावतोस? याचेच नाव वैर. सर्व पुर्वीचे वैर! तुम्ही असे पाहिले आहे का कुठे?
प्रश्नकर्ता : सगळीकडे तेच दिसते!
दादाश्री : म्हणूनच मी सांगतो ना, की या भानगडीपासून दूर व्हा आणि माझ्याकडे या. मी जे मिळवले आहे, ते मी तुम्हाला देतो, तुमचे काम होऊन जाईल आणि यातून सुटका होईल. नाही तर सुटका होणार नाही.