________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
उच्च. जेव्हा या देहासाठी, वाणीसाठी, वर्तनासाठी संपूर्ण निष्पक्षपातीपणा उत्पन्न होतो, तेव्हाच स्वतः स्वतःचे सर्व दोष पाहू शकतो.
आंधळेपणा नाही पाहू देत दोषाला
तुला तुझे किती दोष दिसतात ? आणि किती दोष तू धुऊन टाकतोस ?
प्रश्नकर्ता: दोष तर पुष्कळ दिसतात, जसे की क्रोध आहे, लोभ आहे.
दादाश्री : ते तर चार-पाच दोष, हे जे दिसले ते न दिसण्याबरोबरच आहे. आणि जर तुला इतरांचे दोष पाहण्यास सांगितले तर किती दोष दिसतील ?
प्रश्नकर्ता : पुष्कळ दिसतात.
दादाश्री : पुष्कळ दोष पाहू शकतोस.
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : रस्त्याने जाताना सुद्धा दुसऱ्यांचे दोष दिसतात, 'तुला चालता येत नाही, तू असा चालतोस, तू असा आहेस,' असे सर्व दोष दिसतात आणि स्वतः चे दोष मात्र दिसतच नाहीत. कारण क्रोध-मानमाया - लोभामुळे आंधळा झालेला आहे. लोभाने आंधळा, क्रोधाने आंधळा, मायेने आंधळा, मानाने आंधळा, हे सर्व अंध स्वरुप आहे. उघड्या डोळ्यांनी आंधळा होऊन फिरतात, भटकत राहतात. ही केवढी मोठी उपाधि म्हटली जाईल !
संपूर्ण जग उघड्या डोळ्यांनी झोपलेले आहे आणि सर्व काही झोपेतच करत आहेत, असे महावीर भगवंत सांगतात. कारण ते स्वत:चे अहित करीत आहेत. उघड्या डोळ्यांनी अहित करीत आहे, याला भगवंतांनी भावनिद्रा म्हटले. संपूर्ण जग भावनिद्रेतच आहे. 'मी शुद्धात्मा आहे.' असे भान झाल्यानंतर भावनिद्रा सर्वांश (पूर्णपणे) गेली असे म्हटले जाईल, जागृत झालो असे म्हटले जाईल.