________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
दादाश्री : दुसऱ्यांचे दोष पाहणे यास आम्ही निमित्ताचा चावा घेण्याची स्थिती म्हणतो. अरेरे, तू निमित्तालाच चावलास? तो तुला शिव्या देतो, हा तर तुझ्या कर्माचा उदय आहे आणि हा उदय तुला भोगायचा आहे. त्यात तो निमित्त आहे. निमित्त तर उपकारी आहे, तो तर तुला कर्मातून सोडविण्यासाठी आला आहे. तो उपकारी आहे आणि तू त्याला शिव्या देतोस ? तू त्याला चावायला धावतोस ? म्हणजे तू निमित्ताचा चावा घेतलास असे म्हटले जाईल. म्हणून हे महात्मा घाबरतात की नाही, आता आम्ही निमित्ताला कधीही चावणार नाही !
'याने मला फसवले' असे बोलणारा भयंकर कर्म बांधतो ! त्यापेक्षा दोन थोबाडीत मारल्या तर कमी कर्म बांधले जाईल. हे तर जेव्हा फसवणूक होण्याची वेळ येते, आपल्या कर्माचा तसा उदय येतो तेव्हाच आपली फसवणूक केली जाते. त्यात समोरच्या व्यक्तीचा काय दोष? त्याने तर उलट आपले कर्म संपवले, तो तर निमित्त आहे.
अनुमोदनेचे फळ
प्रश्नकर्ता : दुसऱ्यांच्या दोषाचा दंड आपल्याला मिळतो का ?
दादाश्री : नाही, यात दुसऱ्या कुणाचाही दोष नाही. स्वत:च्या दोषानेच समोरची व्यक्ती निमित्त बनते. हे तर जो भोगतो त्याची चूक. करणे, करविणे आणि अनुमोदन करणे. त्या अनुमोदनेचे सुद्धा फळ येते. केल्याशिवाय फळ येत नाही.
प्रश्नकर्ता : अनुमोदन कशास म्हणतात ?
दादाश्री : कोणी काही कार्य करताना डगमगत असेल तेव्हा तुम्ही म्हणाल की, 'तू आपला कर, मी आहे ना !' यास अनुमोदन केले असे म्हणतात. आणि अनुमोदन करणाऱ्याची जास्त जबाबदारी म्हटली जाते ! काही केल्याचे फळ कोणाला जास्त मिळते ? तर ज्याने जास्त बुद्धी वापरली, त्याला. म्हणजे त्यानुसार वाटणी होते.