________________
वाणी, व्यवहारात...
प्रश्नकर्ता : आपली इच्छा नसूनही क्लेश होतो, वाणी खराब निघते तर काय करावे?
दादाश्री : ते शेवटच्या टप्प्यावर आहे. जेव्हा रस्ता संपत आला असेल ना, तेव्हा आपले भाव नसूनही चुकीचे घडते. तर तिथे आपण काय केले पाहिजे, तर पश्चाताप केला पाहिजे, तेव्हा मग पुसले जाईल, बस. चुकीचे घडले तर हा इतकाच उपाय आहे. दुसरा कोणताही उपाय नाही. ते सुद्धा जेव्हा ते कार्य पूर्ण होत आले असेल तेव्हा मनात खराब करण्याचा भाव तर नसतो तरी देखील खराब कार्य घडते. आणि जर ते कार्य अजून अपूर्ण असेल, तर आपल्याला वाईट करण्याचा भावही होतो आणि वाईट कार्य सुद्धा केले जाते, दोन्हीही होते.
प्रश्नकर्ता : हेतू चांगला आहे तर मग प्रतिक्रमण का करायचे?
दादाश्री : प्रतिक्रमण तर करावे लागते, कारण समोरच्याला दुःख झाले ना. आणि व्यवहारात लोक म्हणतील ना, बघा ही बाई, नवऱ्याला कशी धमकावते. त्यावर मग प्रतिक्रमण करावे लागते. जे डोळ्यांनी दिसते, त्याचे प्रतिक्रमण केले पाहिजे. जरी आत तुमचा हेतू सोन्यासारखा असेल, पण तो काय कामाचा? तो हेतू चालणार नाही. हेतू जरी शुद्ध सोन्यासारखा असला तरी देखील आम्हाला प्रतिक्रमण करावे लागते. चूक झाली की प्रतिक्रमण करावे लागते. ह्या सर्वच महात्म्यांची इच्छा आहे, आता जगत कल्याण करण्याची भावना आहे. हेतू चांगला आहे, पण तरीही चालणार नाही. प्रतिक्रमण तर सर्वात पहिले करावे लागेल. कपड्यावर डाग पडला तर लगेच धुवून टाकता ना? तसे हे कपड्यावरचे डाग आहेत.
ही 'आमची' टेपरेकॉर्ड वाजते, त्यात काही चुकभूल झाली तर आम्हाला लगेचच त्याचा पश्चाताप करावा लागतो. त्याशिवाय चालत नाही. टेपरेकॉर्डप्रमाणे निघते, म्हणून आमची वाणी बिनमालकीची आहे, पण तरी सुद्धा आमच्यावर जबाबदारी येते. लोक तर असेच म्हणतील ना, ‘पण साहेब, टेप तर तुमचीच आहे ना?' असे म्हणतील की नाही? ही काय दुसऱ्याची टेप होती? म्हणून हे शब्द आम्हाला धुवावे लागतात. वाईट शब्द बोलू शकत नाही.