________________
२४
वाणी, व्यवहारात...
न्याय काय म्हणतो? नऊला बाराने भागा, त्यामुळे पुन्हा गोंधळून जातो. न्याय तर काय सांगतो, तो असे-असे बोलला, तर तुम्हालाही असे बोलले पाहिजे. तुम्ही एक वेळा बोलले तर तो दोन वेळा बोलेल. तुम्ही दोन वेळा बोलाल तर समोरचा दहा वेळा बोलेल.
ज्या प्रकारच्या व्यवहाराने गुंडाळलेले आहे, त्या प्रकारच्या व्यवहाराने उलगडत जाते. तुम्ही जर मला विचारले की तुम्ही मला रागवत का नाही? तर मी म्हणेन की, तुम्ही तसा व्यवहार आणलेला नाही. जितका व्यवहार तुम्ही आणला होता, तितक्या वेळा तुम्हाला टोकले. त्यापेक्षा जास्त व्यवहार आणला नव्हता. आम्हा ज्ञानी पुरुषांची कठोर वाणीच नसते आणि समोरच्यासाठी कठोर वाणी निघते ते आम्हाला आवडत नाही. आणि तरीही निघाली, म्हणून आम्ही लगेच समजून जातो की, याच्यासोबत आम्ही असाच व्यवहार आणलेला आहे. वाणी ही समोरच्या व्यक्तिच्या व्यवहाराप्रमाणे निघत असते. वीतराग पुरुषांची वाणी निमित्ताच्या आधीन निघत असते.
कोणी म्हणेल, ‘ह्या भाऊशी दादा कडक शब्दात का बोलतात?' पण यात दादा तरी काय करतील? त्याने तसाच व्यवहार आणलेला आहे. कित्येक माणसे तर अगदी नालायक असतात तरी सुद्धा दादा आवाज वाढवून बोलले नाहीत, त्यावरूनच हे नाही का कळत की त्याने स्वत:चा व्यवहार किती सुंदर आणला आहे! ज्याने कठोर व्यवहार आणला असेल त्याच्यासाठी आमच्याकडून कठोर वाणी निघते.
आता आपल्याकडून जी उलट-सुलट वाणी निघते, ती समोरच्याच्या व्यवहाराला आधीन राहून निघते, परंतु आपल्याला तर मोक्षाला जायचे आहे, म्हणून त्याचे प्रतिक्रमण करून घ्यावे.
प्रश्नकर्ता : पण बाण सुटला, त्याचे काय? दादाश्री : ते व्यवहाराधीन आहे. प्रश्नकर्ता : अशी परंपरा राहिली तर वैर वाढेल ना? दादाश्री : नाही, म्हणून तर आपण प्रतिक्रमण करीत असतो.