________________
वाणी, व्यवहारात...
दादाश्री : शब्दांमुळेच तर जग निर्माण झाले आहे. जेव्हा शब्द बंद होतील, तेव्हा जग बंद होऊन जाईल. __या जगात जी सर्व भांडणे झालेली आहेत ती शब्दांमुळेच झालेली आहेत. शब्द गोड असावेत, आणि जर शब्द गोड नसतील तर बोलूच नका. अरे, आपल्याशी कोणी भांडले असेल, त्याच्यासोबतही आपण जर गोड बोललो ना, तर दुसऱ्याच दिवशी पुन्हा एक होऊन जाऊ.
समोर कोणी ज्येष्ठ व्यक्ति असेल, तरी त्याला म्हणेल 'तुम्हाला अक्कल नाही.' म्हणजे त्यांची अक्कल मापायला निघाले! असे बोलावे का? मग तर भांडणच होणार ना! आपण असे बोलू नये. 'तुम्हाला अक्कल नाही' असे बोलल्यावर समोरच्याला दुःख होईल म्हणून असे बोलू नये. सामान्य माणूस तर त्याला समज नसल्यामुळे असे बोलून जबाबदारी स्वीकारतो. पण जो समंजस आहे, तो तर अशी जबाबदारी घेणारच नाही ना! समज नसलेला जरी उलट बोलला, तरी स्वतः मात्र सुलट बोलतो. समोरचा तर अज्ञानतेमुळे वाटेल ते विचारेल पण आपण उलट बोलायला नको. जबाबदारी स्वतःची आहे.
समोरच्या व्यक्तिला 'तुम्हाला समजणार नाही' असे म्हणणे, हे तर खूपच मोठे ज्ञानावरण कर्म आहे. 'तुम्हाला समजणार नाही' असे आपण बोलू नये, पण 'तुम्हाला समजावून सांगतो' असे बोलावे. 'तुम्हाला समजणार नाही' असे बोललो तर समोरच्याच्या काळजाला घाव पडतात.
आपण आरामात बसलेलो असू आणि कुणीतरी येऊन म्हणेल की, 'तुम्हाला अक्कल नाही.' इतकेच जरी बोलला, की झाले, संपले! आता यात काय त्यांनी दगड मारला?
शब्दांचाच परिणाम आहे या जगात. जर कोणाच्याही हृदयावर घाव लागला, तर तो शंभर-शंभर जन्मांपर्यंत सुद्धा भरत नाही. तो म्हणेल की, 'तुम्ही असे बोलले होते की ज्यामुळे माझ्या हृदयाला घाव लागला आहे. हे सर्व परिणामच आहेत! हे जग शब्दांच्या परिणामामुळेच उभे राहिले आहे.