________________
सत्य-असत्याचे रहस्य
45
तेव्हा तो म्हणतो, 'नाही, आज शनिवारच आहे.' म्हणून मग आम्ही आग्रह धरुन ठेवत नाही, सोडून देतो. आणि हे फक्त सांसारिक व्यवहारातच नाही, ज्ञानात सुद्धा असेच करतो. आम्ही स्वत:च्या ज्ञानाचा सुद्धा आग्रह धरत नाही. कुठे डोकेफोड करत बसायचे? रात्रभर डोकेफोड केली तरी तो तर भिंतीसारखाच आहे. तो काही स्वतःचा आग्रह सोडत नाही, त्यापेक्षा आपण सोडून दिलेले बरे. नाहीतर हा जो पकडून ठेवण्याचा अहंकार आहे तो निघत नाही, आणि तो निघाल्याशिवाय आपण सुटू शकत नाही, आपली मुक्ति होत नाही.
'हे माझे खरे आहे' हा एक प्रकारचा अहंकार आहे, त्यालाही काढावे तर लागेल ना?
हरला, तो जिंकला आपण समोरासमोर व्हायला आलेलो नाही, आपली खरी गोष्ट दाखविण्यास आलो आहोत. संघर्ष केला की, 'तुझे खोटे आहे, व आमचे खरे आहे' असा वाद आम्ही घालत नाही. 'भाऊ, तुझ्या दृष्टीने तुझे खरे' असे सांगून पुढे चालायला लागतो. नाहीतर यास ज्ञानाची विराधना केली असे म्हटले जाईल. ज्ञानात विराधक भाव नसावा. कारण ती त्याची दृष्टी आहे. त्याला आपण खोटे कसे म्हणू शकतो? पण यात जो आग्रह सोडतो तो वीतराग मार्गाचा, आणि यात जो जिंकतो तो वीतराग मार्गाचा नाही, मग जरी तो जिंकला असेल तरीही. असे आम्ही स्पष्ट सांगतो. आम्हाला काही हरकत नाही. आम्ही उघडपणे सांगू शकतो. आम्ही तर जगापासून हरून बसलो आहोत. आम्ही समोरच्याला जिंकविले तर बिचाऱ्याला झोप तरी येईल. मला नाहीतरी आरामशीर झोप येते, हरल्यावरही झोप. आणि तो जर हरला तर त्याला झोप येणार नाही, तेव्हा मग त्याचा त्रास मलाच होणार ना! तो बिचारा माझ्यामुळे झोपू शकला नाही ना?! अशी हिंसा आमच्यात नसते! कोणत्याही प्रकारची हिंसा आमच्यात नसते.
एखादा मनुष्य खोटे बोलतो, उलट-सुलट बोलतो, त्यात त्याचा दोष नाही. तो कर्माच्या उदयाच्या आधीन बोलतो. पण तुमच्याकडून उदयाधीन बोलले गेले तर तुम्ही मात्र त्याचे जाणकार असले पाहिजे की,