________________
सत्य-असत्याचे रहस्य
सत्य, प्रिय, हित आणि मित, असे चारींचा गुणाकार करून बोलशील तर सत्य आहे, नाहीतर असत्य आहे.
नग्न सत्य, शोभत नाही
नग्न सत्य बोलणे हा भयंकर अपराध आहे. कारण, कित्येक बाबतीत तर सत्य व्यवहारात जसे बोलले जाते तसेच बोलावे. कोणाला दुःख होईल, अशी वाणी सत्य म्हटली जातच नाही. नग्न सत्य म्हणजे केवळ सत्यच बोलले, तर तेही खोटे म्हटले जाईल.
32
नग्न स्वरुपात सत्य कशास म्हणतात ? की स्वतःची आई असेल तिला म्हणेल, ‘तू तर माझ्या बापाची बायको आहेस'! असे म्हटले तर शोभेल का ? हे जरी सत्य असले तरी आई शिव्या देईल ना ? आई काय म्हणेल? ‘मेल्या, तोंड दाखवू नकोस, कारट्या!' अरे, पण मी तर हे सत्यच बोलत आहे. तू माझ्या बापाची बायको आहेस, आणि हे तर सगळेच मान्य करतील अशी गोष्ट आहे ! पण असे बोलू नये. अर्थात् नग्न सत्य बोलायला नको.
सत्य, पण प्रिय असले पाहिजे
म्हणजे सत्याची व्याख्या काय करण्यात आली आहे ? व्यवहार सत्य कसे असायला हवे ? व्यवहार सत्य कुठपर्यंत म्हटले जाते ? की सत्याचे शेपूट धरून बसला आहात ते सत्य नाही. सत्य म्हणजे साधारणपणे व्यवहारात खरे असले पाहिजे. पण तेही पुन्हा समोरच्याला प्रिय असले पाहिजे.
लोक म्हणत नाहीत का की, 'अरे ए, काण्या, तू इकडे ये.' तर त्याला चांगले वाटेल का ? आणि कोणी त्याला हळूवारपणे विचारले की, 'भाऊ, तुमचा डोळा कशाने गेला ?' तेव्हा तो उत्तर देईल की नाही ? आणि त्याला काण्या म्हटले तर ? हे सत्य आहे पण त्याला वाईट वाटेल ना? म्हणून हे उदाहरण दिले. सत्य हे प्रिय असले पाहिजे.
नाहीतर जे सत्य समोरच्याला प्रियकारी नसेल तर ते सत्य मानले जात नाही. कोणी वयोवृद्ध असेल तर त्यांना 'आजी' म्हणावे. त्यांना म्हातारी म्हटले तर त्या म्हणतील, 'मेल्या, मला म्हातारी म्हणतोस ? !'