________________
सत्य-असत्याचे रहस्य
ते सत् आहे आणि ते सत् अविनाशी असते. सत्चाच अनुभव करण्याची गरज आहे. जे विनाशी आहे त्याचा अनुभव निरर्थक आहे.
प्रश्नकर्ता : तर परमसत्याची प्राप्ती कशा प्रकारे होईल?
दादाश्री : 'मी कोण आहे' याचे भान नाही, पण 'मी आहेच' असे भान झाले म्हणजे परम सत्याची प्राप्ती होण्याची सुरुवात झाली. इथे तर 'मी आहे' याचेही भान नाही. हे तर, 'डॉक्टर साहेब, मी मरून जाईन' असे म्हणता! 'मी कोण आहे' याचे भान होणे ही तर नंतरची गोष्ट आहे. पण 'मी आहेच, माझे अस्तित्व आहेच,' असे भान झाले तर परम सत्याच्या प्राप्तीची सुरुवात झाली. अस्तित्व तर आहे, अस्तित्वाचा स्वीकारही केला आहे, पण अजून त्याचे भान झाले नाही. आता स्वत:ला स्वत:चे भान झाले म्हणजेच परम सत्याची प्राप्ती झाली.
'मी चंदुभाऊ आहे' अशी मान्यता आहे तोपर्यंत परम सत्य प्राप्त होतच नाही. 'चंदुभाऊ तर माझे नाव आहे आणि मी तर आत्मा आहे' अशी प्राप्ती झाली, आत्म्याचे भान झाले तर परम सत्य प्राप्त होते.
'मी तर आत्मा' हेच सत् आता खरे सत् कोणते? तुम्ही आत्मा आहात, अविनाशी आहात हे खरे सत् आहे ! ज्याचा कधी विनाश होत नाही ते खरे सत्. जे भगवंत आहे ते सत्च म्हटले जातात. बाकी, जगाने तर सत् पाहिलेलेच नाही. सत्ची तर गोष्टच कुठे असते! आणि हे जे सत्य आहे ते तर शेवटी असत्यच आहे. ह्या संसारातील जी सगळी नावे दिली गेली आहेत ते सगळेच सत्य आहे, पण विनाशी आहे.
आता 'चंदुभाऊ' हे व्यवहारात खरे आहे, ते सत्य आहे पण भगवंतांकडे हे असत्य आहे, कशामुळे? स्वतः निनावी आहे. जेव्हा हा 'चंदुभाऊ' नामी (नाव असलेला) आहे. म्हणून त्याची तिरडी निघणार. पण निनावीची तिरडी निघत नाही. नाव असणाऱ्याची तिरडी निघते. पण निनावीची तिरडी निघते का? म्हणून हे सत्य व्यवहारापुरतेच सत्य आहे. नंतर ते असत्य होऊन जाते.