________________
८०
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
प्रश्नकर्ता : व्यावहारिक बाबतीत जे मतभेद होतात त्यांना विचारभेद म्हणतात की मतभेद म्हणतात?
दादाश्री : त्यांना मतभेद म्हणायचे. हे ज्ञान घेतले असेल तर त्यांना विचारभेद म्हणावे, नाहीतर मतभेद म्हणावे. मतभेदाने तर झटका लागतो!
प्रश्नकर्ता : मतभेद कमी असतील, तर ते चांगले नाही का?
दादाश्री : माणसांना मतभेद तर नसलेच पाहिजे. जर मतभेद असतील तर ती माणुसकीच म्हणता येणार नाही. कारण की मतभेदामुळे तर काहीवेळा मनभेद होऊन जातो. मतभेदातून मनभेद होतो म्हणून 'तू अशी आहेस, तू तुझ्या माहेरी निघून जा' असे जे होत असते त्यात मग मजा रहात नाही. अर्थात जसे-तसे करुन निभाऊन घ्यायचे.
प्रश्नकर्ता : आता तर थेट मतभेदापर्यंत पोहचले आहे.
दादाश्री : हेच तर सांगतो आहे ना, हे सर्व चांगले दिसत नाही. बाहेर शोभत नाही. त्यात काही अर्थ नाही. अजूनही सुधारता येईल असे आहे. आपण मनुष्य आहोत म्हणून सुधारता येईल. कशासाठी असे झाले पाहिजे? मूल्नो, फजिती का करुन घेता? काहीतरी समजावे तर लागेल ना? ह्या सर्वात सुपरफ्लुस (वरपांगी) रहायचे आहे, नाहीतर ह्या स्त्रीचे मालक होऊन बसले आहेत ही माणसे तर. अरे मेल्या, मालकीपणा कशाला बजावतो आहेस? हे तर इथे जगताय तोपर्यंत मालक आणि डायवोर्स घेत नाही तोपर्यंत मालक. उद्या बायकोने डायवोर्स घेतल्यावर तू कसला मालक?
प्रश्नकर्ता : आजकाल सगळेच डायवोर्स घेतात. घटस्फोट घेत आहेत, ते लहान-लहान मुलांना सोडून घटस्फोट घेतात, तर त्यांची हाय नाही लागत?
दादाश्री : लागते ना, पण ते काय करणार? वास्तविक घटस्फोट नाही घेतला पाहिजे. खरे तर सारे निभाऊन घेतले पाहिजे. मुलं होण्या आधी घटस्फोट घेतला असेल तर हरकत नाही, पण हे मुलं झाल्यावर घेतात, तर मुलांची हाय लागते ना!