________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
लग्न झाले त्या दिवसाचा आनंद आठवणे हितकारी की, विधुर झालो त्या दिवसाचा शोक आठवणे हितकारी !
आम्हाला तर लग्नाच्या वेळेसच विधुर होण्याचे विचार आले होते ना !! लग्नाच्या वेळेस नवीन फेटा बांधला होता. त्या दिवसात फेटे घालत असत. पण नंतर फेटा सरकल्यावर मनात विचार आला की लग्न करायला तर बसलो आहे, दोघांचे मिलन होत आहे, पण आता दोघांपैकी एक तर विधुर होणारच ना !
प्रश्नकर्ता : त्या वयात तुम्हाला असे विचार आले होते ?
दादाश्री : का नाही येणार ? एक चाक तर मोडणारच ना? लग्न केले म्हणजे वैधव्य आल्याशिवाय राहणार नाही.
प्रश्नकर्ता : पण लग्नाच्या वेळेस तर जोश चढलेला असतो, किती मोह असतो, अशावेळी वैराग्याचा विचार कुठून येईल ?
दादाश्री : पण त्यावेळी विचार आला की लग्न झाल्यानंतर विधुरपणा तर येणारच. दोघांपैकी एकाला तरी वैधव्य येणारच. तिला तरी येईल नाहीतर मला येईल.
सर्वांच्या उपस्थितीत, सूर्यनारायणाच्या साक्षीने ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न केले तेव्हा ब्राह्मणाने सांगितले की समय वर्ते सावधान (शुभ मंगल सावधान) तर तुला सावधही होता येत नाही ? वेळेनुसार सावधान व्हायला हवे, भटजी बोलतात की समय वर्ते सावधान ते तर भटजीनांच समजते, पण लग्न करणाऱ्याला कसे समजेल ? सावधानचा अर्थ काय ? तर म्हणतात, बायको उग्र (क्रोधीत) झाली असेल तर तू थंड होउन जा, सावध हो. समय वर्ते सावधान अर्थात् परिस्थिती अनुसार सावध राहणे आवश्यक आहे. तरच संसारात लग्न करावे. ती जर संतापली असेल आणि आपणही संतापलो तर त्याला बेसावधपणा म्हणायचा. ती जेव्हा संतापेल तेव्हा आपल्याला शांत रहायचे. सावध राहण्याची गरज नाही का ? आम्ही तर सावध होतो, फट पडू दिली नाही. मतभेद पडायला लागले की लगेचच वेल्डिंग करुन देत होतो.
प्रश्नकर्ता : क्लेश होण्याचे मुख्य कारण काय आहे ?