________________
कर्माचे विज्ञान
४७
प्रश्नकर्ता : पति-पत्नी दोघे भांडत असतील, तर याच्यात कोणाचे कर्म खराब समजावे?
दादाश्री : दोघांपैकी जो कंटाळतो त्याचे. प्रश्नकर्ता : यात तर कोणी कंटाळतच नाही, ते तर भांडतच राहतात. दादाश्री : तर मग दोघांचे. नासमजीमुळे हे सर्व होत असते.
प्रश्नकर्ता : आणि जर ही समज आली तर काही दुःखच नाही ना मग!
दादाश्री : हे समजले तर काही दु:खच नाही. हे तर असे आहे की एका मुलाने जर दगड मारला, तर त्याला मारायला धावतो आणि त्याच्यावर खूप रागावतो. रागावतो की नाही? आणि जर डोंगरावरून दगड डोक्यावर पडला आणि रक्त निघाले तर? तर कोणावर रागवेल?
प्रश्नकर्ता : कोणावरच नाही.
दादाश्री : अशाप्रकारे हे आहे. नेहमी जो मारणारा आहे तो निमित्तच आहे, हे तर भान नाही म्हणूनच हा रागावतो! असे जर त्याला निमित्त समजले तर दुःखच नाही!
सुख देऊन सुख घ्या जसे आपण बाभुळीचे झाड लावतो आणि त्याच्यातून आंब्यांची आशा ठेवली तर चालणार नाही ना? जसे पेरतो, तसे फळ मिळते. आपण जसे जसे कर्म केले आहे, तसे फळ आपल्याला भोगायचे आहेत. कोणाला शिवी दिली असेल तर त्या दिवसापासून त्याच्या लक्षातच असते की, केव्हा मला भेटेल आणि केव्हा मी त्याला परत करेन. लोक बदला घेतात, म्हणून असे कर्म करू नका की ज्यामुळे लोक दु:खी होतील. आपल्याला जर सुख हवे असेल तर सुख द्या.
जर कोणी आपल्याला दोन शिव्या दिल्या तर काय करायला हवे? त्या जमा करून घ्याव्यात. पूर्वी आपण दिली आहे, ती परत करुन गेला.