________________
१५३
स्मृति-मंजूषा
वालचंद देवचंद शहा, मुंबई. जागृत विवेकशीलता
सन् १९५३ मध्ये कुंथलगिरी क्षेत्रावर चातुर्मास असताना बरीच विद्वान व पंडितमंडळी दर्शनास आली. त्यांनी श्री. कानजी स्वामींचे उपदेशाबाबत तक्रार श्रींच्या समोर मांडली. त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून महाराज म्हणाले, 'एक श्वेतांबर साधु आपल्या अनुयायासह दिगंबर धर्मात येत आहे तर त्याच्याशी प्रेमाने वागून आपली तत्वदृष्टी आचारमार्ग यांची प्रत्यक्ष आचरणाने त्यांना जाणीव द्या. निंदा किंवा तिरस्काराने ही मंडळी आपणाशी एकरूप होणार नाहीत. इतरांना आपलेसे करण्याचा मार्ग प्रेम व अहिंसा आहे हे विसरू नका.' किती सूक्ष्म विवेक ! ।
आत्यंतिक निकोप निर्भयवृत्ति
मध्य प्रदेशातील विहारात दमोहजवळील एका क्षेत्रावर असतांना ‘डोंगरावर क्रूर श्वापदे आहेत' असे ऐकूनही डोंगरावर रात्रौ एकाकी राहण्याचा निर्धार करून डोंगरावर अरण्यात एकाकी रात्रीला वसती सुरू केली. रोज सकाळी ७॥ ला नियमाने खाली उतरत. एके दिवशी महाराज ८॥ पर्यंत खाली न उतरल्यामुळे भक्त घाबरून डोंगरावर जाऊ लागले. वाटेत महाराज खाली उतरतांना भेटले. साहजिकच 'आज उशीर का झाला ? ' म्हणून विचारणा केली. महाराजांनी उत्तर देण्याचे टाळले. फार आग्रह झाल्यावर त्यांनी झालेली घटना सांगितली. 'सामायिक आटोपल्यानंतर डोळे उघडून पाहतात तो समोर १०-१५ फुटावर वनराज वाघ आपणाकडे पाहत असलेला लावून तो उठून जाईपर्यंत त्याचेकडे दृष्टी लावून बसलो. दोघेही आपले ठिकाणी स्वस्थ ! पंधरा मिनिटांनी निघून गेल्यानंतर खाली उतरलो.' एकाने विचारलेच 'महाराज ! त्यावेळी आपले मनात कसे विचार येत होते?' त्याला उत्तर मिळाले-" मूक उपदेश देत होतो, भव्य जीवा ! हिंसा करू नको. या हिंसक पर्यायातून सुटून आत्मकल्याणाच्या मार्गाला लाग." केवढी निर्भयवृत्ति व क्रूरप्राण्याच्या कल्याणाची भावना !
प्रसिद्धिविन्मुखता
सन १९५२ मध्ये दहिगाव येथे १०८ शांतिसागर जीर्णोद्धारक संस्थेची साधारण वार्षिक सभा सुरू होती. तेथे पू. महाराजांचे चरित्र प. श्री. सुमेरचंदजीकरवी लिहवून ते ग्रंथमालेतर्फे प्रसिद्ध करावे असे ठरले. तसे पंडितजींना पण सांगितले. परंतु दुसरे दिवशी ही हकिकत महाराजांना समजल्यानंतर त्यांनी स्पष्ट आदेश दिला की, “माझे चरित्र लिहू नका व प्रसिद्ध करू नका. ते उचित नाही. तसे करणार नाही अशी प्रतिज्ञा घ्या." या आदेशामुळे पंडितजींना तसे कळवावे लागले. तथापि त्यांनी स्वतः चरित्र लिहून प्रसिद्ध केले व महाराजांना दाखविले. परंतु महाराजांना तेही आवडले नाही. महाराज त्यांचेवर उदासीनच होते. त्यांना स्वतःची स्तुती मुळीही रुचत नसे.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org