________________
स्मृति-मंजूषा
१३९ महाराजांच्या वचनाला दानवीर रावसाहेबांनीही पुष्टी दिली व तो समग्र ग्रन्थ टीका व अनुवादासह आपण प्रकाशित करू असे सांगितले. मी महाराजांचा आदेश मान्य केला व या ग्रंथावरील टीका कोठे मिळतील याविषयी शोध करावयास सुरुवात केली.
भाण्डारकर इन्स्टिटयूटमध्ये या मूलाराधना ग्रंथावर अतिशय विस्तृत अशी अपराजित सूरींची विजयोदया टीका आहे असे मला समजले तेव्हा शंभर रुपये डिपाझिट ठेवून त्या टीकेच्या दोन प्रती आणून तीन महिन्यांच्या आत ती समग्र टीका लिहून घेतली व पंडित आशाधरांनीही या ग्रंथावर आराधनादर्पण म्हणून संक्षिप्त टीका लिहिली आहे असा सागारधर्मामृताच्या प्रशस्तीत उल्लेख मला आढळून आला व ती टीका कारंजा येथील एका जैन मंदिरात आहे असे समजले. त्या मंदिराचे व्यवस्थापकाशी पत्रव्यवहार करून ती टीका मिळविली पण ती टीका अपूर्ण अर्थात मूलाराधनेच्या उत्तरार्धाचीच मिळाली. पूर्ण ग्रंथाची मिळाली नाही. पण जेवढी मिळाली तिचा विनिवेश अनुवाद बरोबर केला आहे. त्याचप्रमाणे अमितगति आचार्यांनी या मूलाराधनेच्या प्रत्येक गाथेचा अभिप्राय पूर्णपणे संस्कृत पद्यात आणिला आहे, व त्याला त्यांनी भगवती आराधना हे नाव दिले आहे. पण हिचे आरंभीचे १८ श्लोक मिळाले नाहीत. या टीकाद्वयाचा व अमितगत्याचार्यांच्या संस्कृत श्लोकांच्या आश्रयाने अनुवाद करण्यास जी माहिती पाहिजे होती ती चांगली मिळाली. त्यामुळे हिन्दी अनुवाद करण्याचे साहस केले.
पंडित आशाधरांची जी अपुरी टीका ज्यांनी पाठविली होती त्यांनी काही विलक्षण अटी घातल्या होत्या. त्या सर्व अटी दानवीर धर्मवीर रावसाहेब दोशी यांनी मान्य केल्या व त्याप्रमाणे त्यांनी सर्व उदारपणाने पूर्ण केल्या. वर्ष दीड वर्ष पर्यंत सारखा प्रयत्न करून मूलाराधनेचा अनुवाद पूर्ण केला व नंतर १९०० पृष्ठांचा शास्त्राकार ग्रंथ दानवीरांनी माझे गुरु पं. श्री वंशीधरजी शास्त्री यांच्या श्रीधर मुद्रणालयात मुद्रित करून सन १९३५ च्या अखेरीस प्रकाशित केला. याप्रमाणे ही दुसरी आठवण यथामती लिहिली. या भगवती आराधनेचा आर्यावृत्तामध्येही मी अनुवाद केला आहे व त्याच्या सहा हजार आर्या झाल्या आहेत.
तिसरी
तिसरी आठवण ____ कुडुवाडी येथे महाराजांचे आगमन संघासहित झाले होते. तेथे नवीन जिनमंदिर बांधले असल्यामुळे तेथे पंचकल्याणक प्रतिष्ठा होती त्यावेळी सोलापूर येथील सेठ सखाराम देवचंद शहा हे सहकुटुंब महाराजांच्या दर्शनास गेले होते. मीही त्यांचे बरोबर गेलो होतो. महाराजांना मी वंदन केल्यावर महाराजांनी आता कोणत्या ग्रंथाचे लेखन चालू आहे असा प्रश्न मला विचारला. मी त्यांना नम्रपणाने आता काहीच लेखन चालू नाही असे सांगितले. तेव्हा महाराजांनी व दुसरे आचार्यकृत (कुंदकुंदाचार्य) मूलाचाराचा हिन्दी अनुवाद कर असे म्हटले. त्यावर मी महाराजांना म्हणालो, महाराज मूलाचारावर वसुनंदी आचार्यांची विस्तृत टीका आहे, म्हणून मूल गाथांचा व त्या वरील टीकेचाही अनुवाद करण्याने ग्रंथकाराचा सर्व अभिप्राय विषदपणाने स्वाध्याय करणाऱ्यांना अवगत होईल आणि मुनींच्या आचारांचा खुलासा होईल. तेव्हा महाराजांनी टीकेचेही भाषांतर कर असे म्हटले व मी महाराजांचा आदेश त्यांच्या चरणांना वंदन करून स्वीकारला.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org