________________
१२४
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ
आचार्यश्रींची व्यवहारकुशलता आचार्य महाराज जसे प्रशान्त विवेकी होते तसेच ते व्यवहारचतुर व लौकिक आचाराचे चांगल जाणकार होते. एकदा श्रवणबेळगोळ येथील श्रीगोमटेश्वरांच्या दर्शनासाठी जात असता 'हुबळी 'ला संघाचा मुक्काम झाला. दिगम्बर जैन धर्माचे प्रभावक संत-साधु म्हणून शान्तिसागर महाराजांची कीर्ती-प्रभा चोहोंकडे फाकली होती. हुबळी येथे लिंगायताचे मोठे धर्मपीठ आहे. त्या मठाचे अधिपती 'आरूढ स्वामी' प्रसिद्ध आहेत. ह्या मठाचे लाखो शिष्य आहेत. स्वामींचा ह्या संप्रदायात मोठा सन्मान आहे. आपल्या गावी जैनांचे एक महान् साधु आलेले आहेत, तेव्हा त्यांच्या भेटीला जाऊ या, असा विकल्प स्वामींनी आपल्या परिवाराजवळ व्यक्त केला. लगेच मेणा, पालखी वगैरे सजविण्यास सुरुवात झाली; पण स्वामींनी थोडा विचार करून पुनः सर्वांना आज्ञा केली की, 'एका नग्न दिगम्बर संत महापुरुषाच्या भेटीला जाताना या वैभवाचे प्रदर्शन औचित्यपूर्ण ठरणार नाही. तेव्हा आपण सगळे चालतच जाऊ' असे ठरवून आपल्या शेकडो शिष्यांसह आरूढ स्वामी आचार्यश्रींजवळ येऊन पोहोचले व शास्त्र-सभेत सामील झाले.
एवढा मोठा जनसमुदाय अनपेक्षितपणे शास्त्रास येऊन दाखल झाल्याने क्षणभर गोंधळ उडाला व शास्त्र-वाचन थांबले; पण पुनः क्षणभरातच ते पूर्ववत् चालू झाले. त्यावेळी मुनि श्री नेमिसागर (कुडचीकर) शास्त्र वाचीत होते. थोडा वेळ शास्त्र-वाचन चालले. त्या दिवशी सम्यक्त्व व मिथ्यात्वाचे स्वरूप हा शास्त्राचा विषय होता. शास्त्र संपताच मठाधीश आरूढस्वामी आचार्यश्रींना उद्देशून म्हणाले, “स्वामीजी आता शास्त्राच्या वेळी वरचेवर उच्चारलेले 'सम्यक्त्व आणि मिथ्यात्व' म्हणजे काय ? हे काही समजले नाही. काय त्याचा अर्थ ?"
क्षणाचाही विलम्ब न लावता आचार्यश्री म्हणाले, 'सम्यक्त्व' म्हणजे 'आत पाहणे' आणि 'मिथ्यात्व ' म्हणजे 'बाहेर पाहणे'. माणसाने नेहमी अंतरंगात पाहून आत्मोन्नती साधावी, बाहेर नजर ठेवून आत्मपराङ्मुख होऊ नये. हे उत्तर ऐकता आरूढस्वामी इतके प्रसन्न व तृप्त झाले की, तेच आचार्यश्रींना साष्टांग नमस्कार करून उभे राहिले आणि मुख्यत्वेकरून आपल्या शिष्यसमुदायाला उद्देशून (आचार्यश्रींकडे तर्जनी दाखवून ) म्हणाले, 'त्यांना म्हणतात खरे गुरू आणि याला म्हणतात खरा उपदेश ? सगळ्या शास्त्रांचा सार या दोन शब्दांत आला आहे, व तो सांगणाऱ्या ह्या महात्म्यालाच सांनी गुरू मानले पाहिजे.' त्यानंतर त्यांच्यासह सर्व अनुयायी गणाने पुनः एकदा आचार्यश्रींना परमादराने प्रणाम केला आणि महाराजांच्या थोरपणाची प्रशंसा करीत ते स्वस्थानी परतले. कोणत्या वेळी कोणत्या लोकांना कोणत्या भाषेत सांगावे, समजवावे ह्याचे तारतम्य अलौकिक स्वरूपात महाराजांचे ठिकाणी निसर्गतःच वास्तव्य करून होते. म्हणून ही प्रभावना सहज साधली गेली.
सारांश-आचार्यश्रींना वेळ, काळ, प्रसंग ह्याचे औचित्य साधण्याची अलौकिक कला स्वभावतःच सिद्ध होती.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org