________________
स्मृति-मंजूषा
१२३ पाठपुरावा करणे आपले कर्तव्य आहे. यात जर कदाचित् अपमान झालाच तर तो परीषह समजून समताभावाने पचविला पाहिजे. त्यात आपले काही अकल्याण नाही. आणि जर कार्य साधले तर त्यात धर्मसेवा व कर्तव्यपूर्तीचा आनन्द यांचा लाभच आहे. केवळ फर्डे वक्तृत्व गाजवून श्रोत्यांना प्रभावित करण्यापेक्षा कर्तव्यासाठी मानापमान शान्तचित्ताने सहन करणे अधिक हितावह आहे.' हे उद्गार कुंभोजच्या पाटलांनी ऐकले व ते सर्द झाले. विचारात पडले आणि तेव्हापासून ते म्हणू लागले, 'माझी समजूत व प्रचार चुकीचा होता. ऐल्लक चन्द्रसागर हे प्रमुख वक्ते खरे, पण मानापमानाचा त्यांचा विकल्प तीव्रतेने जागृत आहे. आचार्यांजवळ मात्र त्याचा लवलेश देखील नाही. म्हणून त्यांचे तपश्चरण आणि कषायाची मन्दता हीच त्यांच्या आचार्यपदाला योग्य असल्याने श्री शान्तिसागर महाराज हेच आचार्यपदाला योग्य आहेत.' आता पाटीलांचे हे बदललेले मत पूर्वीप्रमाणे सर्व जनतेपुढे मांडू लागले व आपली चूक मान्य करू लागले. 'गुरोस्तु मौनं व्याख्यानम्.'
३. आचायांची तत्त्वदृष्टी आचार्य महाराज संघासहित श्रीसम्मेदशिखरजीस जातेवेळी सन १९२८ साली वाटेत ‘मिरज' येथे संघाचा मुक्काम झाला. मिरजचे राजे श्री. बाळासाहेब सरकार (संस्थानिक ) हे आचार्यश्रींच्या दर्शनाला आले होते. तेथे एक बाई आपली एक तीन-चार वर्षांची मुलगी घेऊन दर्शनाला आली. आचार्यांच्या शेजारीच मिरज सरकारही बसले होते. त्या मुलीने स्वयंस्फूर्तीने संघस्थ ऐल्लक श्री चन्द्रसागर महाराजांजवळ सर्व संघास नमस्कार केला. तेव्हा हे पाहून चन्द्रसागर महाराजांनी सहज पण औत्सुक्याने विचारले, 'काय ग, तू कोणाची आहेस ? ' त्यावर ती मुलगी काहीच बोलली नाही. महाराजांनी पुनः विचारले, 'अग तू आईची आहेस काय ?' त्यावर ती मुलगी म्हणाली, 'नाही.' त्यांनी पुन्हा विचारले, 'मग काय बापाची आहेस ?' त्यावर देखील त्या मुलीने स्पष्टपणे 'नाही' असे खणखणीत उत्तर दिले. आता आचार्य महाराज आणि मिरज सरकार श्रीमंत राजे यांच्यासह सर्वांचे लक्ष या मुलीकडे केन्द्रित झाले होते. श्री चन्द्रसागर महाराजांनी पुन्हा तिला विचारले, 'बरं ! मग तू आहेस तरी कुणाची ?" त्यावर त्या मुलीने निःसंदिग्धपणे ठासून सांगितले, 'मी माझीच आहे.' तेव्हा आचार्यश्रींनी स्मित केले आणि चन्द्रसागरसह सर्वांना उद्देशून ते म्हणाले, 'घ्या! ही मुलगी तर तुम्हा सगळ्यांना ‘समयसार' शिकवून गेली की!'
___ त्यानंतर श्रींनी तिला जवळ बोलावून श्रीफलादि फळे आशीर्वाद रूपाने तिच्या हातात देवविली. यावेळी आचार्यभक्त सोलापूरचे श्रीमान् शेठ रावजी सखाराम दोशी यांचेही चित्त हे उत्तर ऐकून हेलावले व त्यांनी आपल्या अंगावरची भरजरी शाल त्या मुलीच्या अंगावर टाकली. त्यानंतर आचार्यश्रींनी श्रीमंत राजे सरकार व समोरच्या मंडळींकडे वळून झाल्या घटनेच्या आधारे थोडाच पण गोड उपदेश दिला. ते म्हणाले, 'पहा ह्या मुलीच्या तोंडून सहज निघालेले उद्गार हेच सर्व शास्त्राचे सार आहे. ह्या जगात कोणी कोणाचा नाही. जो तो स्वतःच्या हिताहिताबद्दल स्वतःच जबाबदार आहे. हे जाणून आत्मकल्याणासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहिले पाहिजे.'
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org