________________
महावीरचरित्र
परस्त्रीसेवन हीं सात प्रकारची व्यसनें सोडणें आणि प्रत्यहीं जिन-बिंब दर्शन घेणें. या गोष्टी श्रावकाने पाळावयाच्या असतात. दुसरी व्रतप्रतिमा. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह या पांच महाव्रतांचे शक्तिनुसार आचरण करणें हे पंचाणु व्रतपालन; दिग्व्रत, अनर्थदंडविरति व भोगोपभोगपरिमाण ह्रीं तीन गुणवतें; सामायिक, प्रत्याख्यान, प्रोषधोपवास व वैयावृत्व ही चार शिक्षावृतें; या तिहींचे पालन म्हणजे व्रतप्रतिमा. तिसरी सामायिकप्रतिमा. त्रिकाल ध्यान करणे हीच सामायिक प्रतिमा. चवथी प्रोषधोपवास प्रतिमा. पर्वतिथींना सोळा प्रहर उपवास करणें म्हणजे प्रोषधोपवासप्रतिमा. पांचवी सचित्तत्यागप्रतिमा. जीवसहित वनस्पतींचें ग्रहण न करणें म्हणजे सचित्तत्यागप्रतिमा. सहावी रात्रिभोजन त्याग प्रतिमा. सातवी ब्रह्मचर्यप्रतिमा. या प्रतिमेच्या श्रावकानें स्वस्त्रीचाहि त्याग केला पाहिजे. आठवी आरंभत्यागप्रतिमा. कोणताहि धंदा किंवा नवा व्यवहार न करणें म्हणजे आरंभ. त्यागप्रतिमा. नववी परिग्रहत्याग प्रतिमा. मिथ्यात्व, लिंगभेद, राग, द्वेष, हास्य, रति, अरति, शोक, भय, जुगुप्सा, क्रोध, मान, माया, व लोभ हे चौदा अंतरंग परिग्रह व क्षेत्र, वास्तु, हिरण्य, सुवर्ण, धान्य, धन, दासी, दास, कुप्य व भांड हे दहा प्रकारचे वहिरंग परिग्रह मिळून चोवीस परिग्रहांचा त्याग म्हणजे परिग्रह त्यागप्रतिमा. दहावी अनुमति त्यागप्रतिमा. वरील कोणत्याहि कर्माची इतरानांहि अनुमति न देणं म्हणजे अनुमतित्यागप्रतिमा. अकराची उद्दिष्टविरतिप्रतिमा. सर्व प्रकारच्या सहेतुक किया करण्याचे सोडणें म्हणजे उद्दिष्टत्यागप्रतिमा. या अकरा प्रतिमा वारण केल्यानंतर श्रावक मुनिदीक्षा घेण्यास लायक होतो. मुनीचे अठ्ठावीस मूळगुण खालीलप्रमाणे आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह या महाव्रतांचे पूर्णपणे पालन करणे हे पांच गुण; ईर्ष्या म्हणजे चलनवलनादि क्रिया अहिंसात्मक पणे करणे, भाषासमिति म्हणजे हित, मित व संशयरहित असेच प्रियवचन बोलणें, फक्त एकाच वेळी पण तेही निर्दोष आहार घेणें ही एषणासमिति; आपली उपकरणें अहिंसात्मक रीतीने ठेवणें व वापरणें ही आदाननिक्षेपणसमिति व जंतुरहित स्थानीं जीवोत्पत्ति न होईल अशा रीतीनें मलमूत्रत्याग करणें ही उत्सर्गसमिति अशा पांच समिति पाळणे; सामायिक, स्तवन, वंदना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान व कायोत्सर्ग अशा षडावश्यक क्रिया करणे आणि पांच इंद्रियांचे विषय सोडणें, मिळून एकवीस गुण झाले. ( १० )