________________
अम्मति-तीर्थ
जैन अध्यासन : भक्तामरस्तोत्र-अध्ययन - उपक्रम
- डॉ. नलिनी जोशी
सन्मति-तीर्थ त्या म्हणाल्या, “सर्वधर्मसमभावाच्या या जमान्यात 'गर्व से कहो हम जैन हैं' - या उद्गारांचा वस्तुतः एक वेगळाच अन्वयार्थ लावणे आपल्याकडून अपेक्षित होते. जैन धर्माची उत्कृष्टता, मौलिकता, प्राचीनता, निरीश्वरता, गुणपूजा, अहिंसा-अनेकांत-स्याद्वाद-शाकाहार-अपरिग्रह - या सर्वांचा फक्त उदोउदो करीत रहाणे हे या वक्तृत्वातून अपेक्षित नव्हते. जैनविद्या (जैनॉलॉजी) ही एक सक्षम ज्ञानशाखा म्हणून जगभरातील विद्यापीठांमध्ये उदयोन्मुख होते आहे. भारतीय संस्कृतीच्या वैभवशाली परंपरेत जैनांनी केलेले विविधांगी योगदान अधोरेखित करणे हे अत्यंत निकडीचे आहे. एकतेचा अभाव, कर्मकांड, अवडंबर, संपत्तीचे प्रदर्शन, आर्थिक घोटाळ्यातील सहभाग, स्व-श्रेष्ठतावादाचा दुरभिमान - या आणि अशा अनेक मुद्यांवर अंतर्मुख होऊन केलेले चिंतनही अपेक्षित आहे. जैन इतिहास, साहित्य, तत्त्वज्ञान, मंदिरनिर्माण इ. कला - यांविषयी प्रत्येक जैन युवक-युवतीने प्रमाणित (ऑथेंटिक) माहिती मिळविण्यासाठी सजग राहिले पाहिजे. आपली बलस्थाने कायम राखून ती जैनेतरांसमोर अधिकारवाणीने मांडता आली पाहिजेत. मूळ गाभ्याला धक्का न लावता वेळोवेळी सामाजिक परिवर्तनांनाही सामोरे गेले पाहिजे."
डॉ. नलिनी जोशी अखेरीस म्हणाल्या, “माझ्या युवक बंधूभगिनींनो, आज आपण व्यक्त केलेल्या विचारांमध्ये परंपरेचा सार्थ अभिमान आणि अंतर्मुखतेने परिवर्तनाला सामोरे जाण्याची तयारी - या दोन्ही गोष्टी आपण अतिशय समतोलपणे मांडल्यात. आपले मन:पूर्वक अभिनंदन ! जैन अध्यासनाच्या माध्यमातून आपण सर्व मिळून राष्ट्रउभारणीच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलू या. धन्यवाद परंतु 'पुनरागमनाय च ।"
शुक्रवार २४ जून रोजी कोथरूड येथील श्री. अजित मुथा यांच्या निवासस्थानी भक्तामरस्तोत्राच्या समग्र अध्ययनाच्या उपक्रमास आरंभ झाला. आत्तापर्यंत जैनॉलॉजीच्या उपक्रमात सामील न झालेल्या नवीन जैन स्त्री-पुरुषांनी यात भाग घ्यावा, म्हणून हा उपक्रम कोथरूडला घेण्यात आला. शुक्रवार, १६ सप्टेंबर रोजी उपक्रमाची सांगता झाली. श्री. व सौ. मुथा यांच्याबरोबरच स्वानंद महिला मंडळाने यात बराच पुढाकार घेतला. एकूण ११ व्याख्याने झाली आणि १२ व्या व्याख्यानाच्या दिवशी सहभागी सदस्यांचे भक्तामरावरील लेखवाचन आणि प्रशस्तिपत्रवितरण समारोह झाला.
प्रारंभीच्या व्याख्यानात डॉ. नलिनी जोशी यांनी भक्तामरस्तोत्राचा काळ, भाषा, कवी, महत्त्व आणि लोकप्रियता यांची रंजक माहिती दिली. त्यानंतर प्रत्येक व्याख्यानात ४-५ श्लोकातील शब्द, भाव, अलंकार, भक्ती आणि सौंदर्य यांचा श्रोत्यांना रसास्वाद घडवून दिला. प्रत्येक शब्दाचा ऊहापोह केला. श्लोकात निहित असलेल्या तात्त्विक संकल्पनांचे स्पष्टीकरण केले. प्रत्येक व्याख्यानास सरासरी ५० जिज्ञासूंची उपस्थिती असली तरी १२ पैकी ९ व्याख्यानांना जे उपस्थित असतील व जे शेवटच्या दिवशी छोटा निबंध स्वतः लिहून, वाचून दाखवतील अशांनाच प्रशस्तिपत्र देण्यात आले. एकूण जिज्ञासूंपैकी १० पुरुष व २० स्त्रिया यांनी प्रशस्तिपत्रे मिळवली.