________________
सन्मति-तीर्थ
.२.
बहारदार वक्तृत्वस्पर्धा ( वृत्तांत)
-
• डॉ. कौमुदी बलदोटा
१९७६ साली पुणे विद्यापीठात स्थापन झालेल्या जैन अध्यासनाने आपल्या उद्दिष्टांची नोंद अत्यंत व्यवस्थितपणे करून ठेवली आहे. (१) जैनविद्येच्या ५६ प्रमुख अंगांनी संशोधन (२) तत्संबंधी उद्दिष्टानुसारी लहान-मोठी प्रकाशने (३) जैनविद्येत गती असणाऱ्यांना अभ्यासवृत्ती (४) समाजप्रबोधनासाठी व्याख्यानमाला अगर लेखमाला (५) प्रतिवर्षी सर्व जैन समाजासाठी एखाद्या स्पर्धेचे आयोजन.
जैन अध्यासनातर्फे २००७ पासून आयोजित केल्या गेलेल्या स्पर्धांपैकी २० ऑगस्ट २०११ ला आयोजित केलेली वक्तृत्वस्पर्धा ही पाचवी स्पर्धा होती. सन्मति - तीर्थ संस्थेच्या शिक्षिका आणि 'जैन जागृति' मासिक पत्रिका यांच्यामार्फत स्पर्धेचा विषय जैन समाजापर्यंत पोहोचला. श्री. श्रेणिक अन्नदाते यांच्या 'तीर्थंकर' मासिकातही स्पर्धेविषयीचा मजकूर पाठवला होता. स्पर्धेचा विषय होता 'गर्व से कहो हम 'जैन' हैं ।'
वयोमर्यादा १५ ते ५० अशी होती. त्याच त्याच लोकांनी भाग न घेता, युवक-युवती पुढे याव्यात, अशी अपेक्षा होती. एकूण २४ स्पर्धकांनी नावनोंदणी केली. प्रत्यक्ष स्पर्धेसाठी २० स्पर्धक आले. अतिशय उत्साहवर्धक गोष्ट म्हणजे स्पर्धकांचे सरासरी वय २५ ते ३० च्या दरम्यान होते. महिला स्पर्धक १५ तर पुरुष स्पर्धक ५ होते.
स्पर्धा पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागात आयोजित करण्यात आली होती. सर्व युवक-युवती स्पर्धेआधी १५ मिनिटे येऊन उपस्थित होते. त्यांनी जैन
सन्मति - तीर्थ
अध्यासनाने प्रकाशित केलेली प्रकाशने उत्सुकतेने पाहिली. नंतर शिस्तबद्धतेने ते वर्गकक्षात गेले. वक्तृत्त्वासाठी प्रत्येकाला आठ मिनिटे देण्यात आली. निम्मे स्पर्धक मराठीत तर निम्मे हिंदी-इंग्लिश (मिश्र) भाषेत बोलले. वातावरण उत्साही, चेहरे अतिशय प्रफुल्लित होते.
पहिल्या व्याख्यानकक्षात सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी दहा स्पर्धकांचे काळजीपूर्वक परीक्षण केले. महत्त्वाच्या मुद्यांना सुहास्य वदनाने दाद देऊन स्पर्धकांचा उत्साह वाढविला. दुसऱ्या व्याख्यानकक्षात तत्त्वज्ञान विभागातील प्रपाठक डॉ. लता छत्रे यांनी दहा स्पर्धकांच्या वक्तृत्वांचे मूल्यांकन केले. डॉ. छत्रे यांचा वेदांत, बौद्ध धर्म आणि स्त्रीवादी चळवळींचा व्यासंग आहे.
स्पर्धेनंतर सन्माननीय परीक्षकांनी अर्धा तास एकत्रित विचारविनिमय करून एकूण पाच नावे पारितोषिक प्राप्त ठरविली. जैन अध्यासनाच्या बजेटमध्ये जेवढी आर्थिक व्यवस्था होती त्याप्रमाणे पुढील बक्षिसे दिली
प्रथम क्रमांक (विभागून) अनुपमा जैन; विनीता कोठारी
—
( प्रत्येकी ७५० रु.)
द्वितीय क्रमांक (विभागून) सुवर्णा सरनोत; मेघ डुंगरवाल ( प्रत्येकी ६०० रु.) तृतीय क्रमांक संगीता नहाटा (५०० रु.) कॉफीपानानंतर लगेचच परीक्षकांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ झाला. यथायोग्य पारितोषिके आणि सर्वांना 'पार्टिसिपेशन सर्टिफिकेटस्' आणि जैन कथांसग्रह भेट देण्यात आला. डॉ. नलिनी जोशी यांनी सुमारे २० मिनिटे समारोपाचा अनौपचारिक सुसंवाद साधला.
६०