________________
चमत्कारिक मुद्रणदोष झालेले आहेत. त्यांचा निर्देश पुढे केला आहे.)
(इ) औपपातिकसूत्र-या सूत्राच्या मुद्रित पोथीत कलांची संख्या ७५ होते. प्रा. सुरू यांनी संपादित केलेल्या औपपातिक सूत्रात सहा कला कंसात ठेवलेल्या आहेत. त्या धरून एकूण ८0 कला होतात, त्या सोडल्यास कला ७४ होतात. प्रा. सुरूच्या पुस्तकात कंसात असणाऱ्या 'वत्थविहि' आणि 'विलेवणविहि' या कला पाथीमध्ये कंसरहित दिल्या आहेत. खेरीज, सुरू-संपादित पुस्तकातील संभव, मुठ्ठिन्जुद्ध, मणिपाग, आणि धाउपाग' या कला पोथीत नाहीत.
__ येथेही पुढील गोष्ट लक्षात घ्यावी :- वर उल्लेखिलेल्या पूर्णार्घ्य' ग्रंथात म्हटले आहे. 'औपपातिकसूत्रामध्ये बहात्तर कलांची एक यादी दिलेली आहे. ती या यादीप्रमाणेच (म्हणजे समवायांगसूत्रातील यादीप्रमाणेच) असून केवळ काही नावांमध्ये फरक आहे.' (पृ.७८७) पण हे विधान संपूर्णपणे बरोबर नाही. कारण औपपातिकसूत्रातील पुढील ८ कला समवायांगसूत्रात नाहीतच. (१) पासक, (२) हिरण्णजुत्ति, (३) सुवण्णजुत्ति, (४) चुण्णजुत्ति, (५) चक्कवूह, (६) गरुलवूह, (७) सगडवूह आणि (८) लयाजुद्ध, म्हणजे येथेही कलांबद्दल लिहिणाऱ्या लेखकाचा घोटाळा झालेला आहे.
(ई) मलयगिरि या टीकाकाराच्या वृत्तीसह असणाऱ्या राजप्रश्नीय सूत्राच्या मुद्रित पोथीत कलांची संख्या ७३ आहे. पण श्री. दोशी यांनी संपादित केलेल्या रायपसेणइयसुत्तच्या मुद्रित पोथीत ७२ कला आहेत, कारण तेथे राज.च्या मुद्रित पोथीतील पडिवूह' ही कला गळलेली अथवा गाळलेली आहे. डॉ.प.ल.वैद्य आणि श्री.ए.टी.उपाध्ये यांनी संपादित केलेल्या 'पएसिकहाणय' ग्रंथात कलांची संख्या बरोबर ७२ आहे. तथापि वर उल्लेखिलेल्या पोथीतल काही कला येथे सापडत नाहीत.
बहात्तर कलांची निश्चिती ____ वर पाहिल्याप्रमाणे कलांची संख्याभिन्नता अभयदेवसूरीसारख्या टीकाकाराच्या लक्षात आली नसती तरच नवल. या स्थितीत ७२ ही कलांची संख्या साधण्यास अभयदेव असे सुचवितो :- काही कलांचा अंतर्भाव अन्य कलांमध्ये होतो असे समजावे. (इहच द्विसप्ततिः इति कलासंख्या उक्ता, बहुतराणि च सूत्रे तन्नामानि उपलभ्यन्ते, तत्र कासांचित् कासुचिद् अंतर्भाव: अवगन्तव्यः ।) हे म्हणणे समाधानकारक वाटत नाही. तसेच, कलांचे वर्ग करून, एका वर्गात अनेक कला घातल्या तरी ७२ हा कलासंख्येचा प्रश्न सुटत नाही. या बाबतीत असे सुचविता येईल :- ज्याप्रमाणे एखाद्या ग्रंथाच्या अनेक हस्तलिखितावरून पाठ निश्चित करताना जास्तीत जास्त हस्तलिखितात आलेला पाठ प्राय: स्वीकारला जातो. त्याप्रमाणे ७२ कलांच्या बाबतीत करावे. म्हणजे असे :- ७२ कला असणाऱ्या सर्व ग्रंथात ज्या कला समानपणे येतात, त्या सर्व घ्यावयाच्या याप्रमाणे क्रमाने करीत गेल्यास ७२ कला ठरविता येतील, ही दृष्टी पत्करून कलांचे परिगणन पुढीलप्रमाणे होईल.
कलांचे परिगणन
कलांच्या सूची एकूण चार ग्रंथांत आहेत. तेव्हा प्रथम चार ग्रंथांत, मग तीन ग्रंथांत, नंतर दोन ग्रंथांत समान असणाऱ्या कला, व शेवटी एकेका ग्रंथांत असणाऱ्या कलांचे निर्देश करता येतील. या संदर्भात पुढील बाबी लक्षात असाव्यात :- (१) ज्ञाताधर्मकथा आणि नायाधम्मकहाओ ही एकाच ग्रंथाची दोन नावे आहेत. (२) राजप्रश्नीय, रायपसेणइय आणि पएसिकहाणय ही एकाच ग्रंथाची नावे आहेत. (३) कलांची नावे प्राकृत भाषेत आहेत. तेव्हा कधी कलानामांची वर्णान्तरे भिन्न असली तरी कला मात्र एकच आहे. अशा कला देताना, वेगळे वर्णान्तर देणाऱ्या ग्रंथाचे नाव कंसात ठेवले आहे. (४) कला-नामांची संस्कृत छाया त्यांचे पुढे स्पष्टीकरण करताना दिली आहे.