________________
सातवाहन हा शृंगारप्रेमी राजा असून त्याने कोट्यवधि सुवर्णनाणी खर्च करून गाथासंग्रह केल्याचा उल्लेखही या प्रबंधामध्ये येतो. ‘शूद्रकं' नावाचा एक 'वीर' आणि दोघांविषयीच्या दंतकथा रंगवून दिल्या आहेत. आज उपलब्ध असलेल्या गाथासप्तशतीत 'पालित्तय' आणि 'शूद्रक' यांच्या नावावर प्राकृत गाथा दिसतात. सातवाहनाच्या दानशूरतेची आणि तीर्थस्थापनेची वर्णने सर्वच आचार्य करतात. सातवाहनाने ' सत्तूंचे दानं पूर्वभवात मुनींना केले इत्यादी दंतकथाही जोडल्या आहेत.
प्रतिष्ठानकल्प मुख्यत्वाने सुव्रतजिनांशी संलग्न असून वारंवार त्यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कथा येतात.
विविधतीर्थकल्पात ‘दक्षिण व बराड' संबंधी जे कल्प आहेत त्यातील एक म्हणजे 'श्रीपुर' येथील 'अन्तरिक्षपार्श्वनाथकल्प' होय. कथेचा आरंभ थेट रामायणापासून होतो. रावण आपल्या माली व सुमाली या योद्ध्यांना कामासाठी दुसरीकडे पाठवितो. त्यांचा बटुक पुजारीही बरोबर असतो. विमानप्रवास सुरू होतो. पुजारी गडबडीत जिनप्रतिमा घेण्यास विसरलेला असतो. विद्याबलाने तो भाविजिन पार्श्वनाथांची वालुकामय प्रतिमा करतो. मालीसुमालींनी पूजन केल्यावर ती विसर्जित करतो. खाली सरोवर असते.
दीर्घकाळ प्रतिमा सरोवरात तशीच रहाते. कित्येक वर्षांनी चिंगउल्ल किंवा विंगउल्ल प्रदेशाचा श्रीपाल राजा तेथे येतो. तो कुष्ठरोगी असतो. सरोवरातील स्नानाने कुष्ठरोग बरा होतो. राणी आश्चर्यचकित होते. तिला स्वप्नात पार्श्वनाथ प्रतिमेचा दृष्टांत होतो. राजा रथातून प्रतिमा नेऊ लागतो. मध्येच वळून पहातो. प्रतिमा अंतरिक्षात सिर होते. राजा 'श्रीपुर' नावाचे नगर वसवितो. चैत्य बांधतो. अंबादेवी क्षेत्रपाल व धरणेंद्र - पद्मावतींच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना करतो. आजही 'श्रीपुर' येथे यात्रा महोत्सव असतो. 'श्रीपुर' या ठिकाणाची विविधतीर्थकल्पात आलेली नोंद अशा प्रकारची आहे.
कौंकण प्रदेशाच्या उत्पत्तीची कथा प्रबन्धचिन्तामणीत आली आहे. समुद्र हटवून काही द्वीपे तयार करून महानन्द राजाने, आपल्या प्रसंगवशात् नावडत्या झालेल्या राणीच्या पुत्राला ती दिली असा उल्लेख आहे. ब्राह्मण परंपरेतील परशुरामाशीही त्याचा संबंध या प्रबंधांमध्ये दिसत नाही. प्रभावकचरितात वज्रस्वामी विहार करीत दक्षिण्याला येतात, असा उल्लेख आहे. ‘स शनैः प्रायात् कुंकणान् वित्तवञ्चणान्ं असा कोंकण प्रांताच्या दारिद्र्याचा उल्लेख दिसतो. तेथून ते 'सोपारपत्तना'स जातात असे म्हटले आहे. अशोकाचे शिलालेख जेथे सापडले ते ' शूर्पारक' (ठाण्याजवळ - नाला सोपारा) हेच असण्याची शक्यता आहे. कोंकणातील जैन तीर्थ अगर प्रतिमांचा उल्लेख नाही.
चतुर्दशपूर्वधारी भद्रबाहू यांचा वृत्तांत प्रबन्धकोशात प्रतिष्ठान (पैठण) येथे घडला असे नोंदविले आहे. भद्रा व ब्राह्मण परंपरेतील सुप्रसिद्ध खगोल- ज्योतिषी वराहमिहिर यांना 'सहोदर' (भाऊ) म्हटले आहे. त्यांचा बृहत्संहिता ग्रंथ सुप्रसिद्ध आहे. कथानकात भद्रबाहू वराहमिहिरांचे' त्यांचे भविष्य कसे अचूक नाहीं हे दाखवून देतात. वराहमिहिर विघ्ने उत्पन्न करतात. त्या विघ्नांच्या उपशमासाठी भद्रबाहू 'उपसर्गहर' स्तोत्राची रचना करतात असे म्हटले आहे. प्रबंधचिंतामणीत मात्र हाच सर्व वृत्तांत पाटलीपुत्र येथे घडला असे म्हटले आहे.
'न्यायावतारसूत्र' या सुप्रसिद्ध जैन न्यायविषयक ग्रंथाचे कर्ते, 'स्तुतिविद्या' आणि 'कल्याणमंदिर' स्तोत्रांचे कर्ते सिद्धसेन दिवाकर आपल्या अखेरच्या दिवसात 'प्रतिष्ठानपुरास आले. त्यांनी तेथेच प्रायोपवेशनाने देहत्याग केला असे प्रभावकचरितात म्हटले आहे.
प्रबन्धचिन्तामणी ग्रंथात गुर्जराधिपती सिद्धराज आणि 'कोल्लापुर येथील राजा यांच्या संबंधातील एक हकीगत सांगितली आहे. तेथील महालक्ष्मी मंदिरातील दीपोत्सवाचा उल्लेख लक्षणीय आहे.
उपसंहार :
आरंभीच म्हटल्याप्रमाणे साहित्यात आख्यायिका, दंतकथा आणि इतिहास यांचे सतत मिश्रण झालेले असते. त्यातून प्रमाणित इतिहास शोधणे फार कठीण असते. हे सर्व गृहीत धरले तरी जैन आचार्यांनी लिहिलेल्या पाच प्रबन्धविषयक ग्रंथांमधून जैन क्षेत्रे व जैन धर्मप्रभावक व्यक्तींचा इतिहास नोंदविण्याची असलेली त्यांची दृष्टी मोलाचा