________________
क्षेत्राचा महिमा आरहंतलोक कसा गाणार नाहीत ?'
द्वापारयुगात कुंतीपुत्र युधिष्ठिराने चंद्रप्रभस्वामींच्या प्रासादाचा उद्धार केला. जवळ बिल्ववृक्ष लावला. ते स्थान 'कुंतीविहार' म्हणून प्रसिद्ध झाले. जैन परंपरेप्रमाणे द्वीपायन ऋषींच्या भविष्यवाणीनुसार द्वारकेचा विनाश झाला. त्या प्रसंगी वज्रकुमार यादव याची पत्नी या ठिकाणी आली. चंद्रप्रभस्वामींना शरण गेली. प्रसूत झाली. तो पुत्र मोठा पराक्रमी नगरप्रमुख झाला. यादव वंश येथे रुजला. त्यानेही चंद्रप्रभतीर्थाचा उद्धार केला. कलियुगात शान्ताचार्यांनी (उत्तराध्ययनाचे टीकाकार) हे तीर्थ उद्धरले. त्यानंतर कल्याणकटक नगरातील 'परमड्डी' राजाने ती प्रतिमा घेण्याचा असफल प्रयत्न केला. मग भवनोद्धार करून २४ गावे दिली. पुढे पल्लीवाल वंशातील माणिक्यपुत्र आणि नाऊ यांचा पुत्र साहु कुमारसिंह या परमश्रावकाने हा प्रासाद नवा केला. आजही तेथे चारही दिशांनी संघ येऊन उत्सव
करतात.
शेवटी असे म्हटले आहे की हा कल्प त्यांनी नासिक्यपुरातच लिहिला.
'प्रतिष्ठानपत्तनकल्प' हा देखील जैन इतिहासाशी कित्येक शतकांपासून जोडलेला दिसतो. त्या कल्पाचा आरंभ महाराष्ट्राच्या वर्णनाने होतो. महाराष्ट्रात ६८ लौकिक तीर्थे असून ५२ जैन तीर्थे आहेत असा उल्लेख आहे. आंध्रभृत्य वंशातील सातवाहन राजांच्या इतिहासाशी प्रतिष्ठान अथवा पैठणचे नाव निगडित आहे. या सर्वच प्रबंधकांनी शातवाहन - सातकर्णी - सालवाहन-सालाहण या राजांना 'जैनधर्मी' असे संबोधले आहे. प्राचीन भारताचे इतिहासकार हे मान्य करीत नाहीत. सातवाहनांच्या राजवटीत जैन धर्माचा प्रचार, प्रसार मात्र येथे भरपूर झालेला दिसतो. मुनिस्त तीर्थंकरांच्या जीवत्स्वामी प्रतिमेचा, लेप्यमयी प्रतिमेचा वारंवार उल्लेख येतो. या क्षेत्राची देवता अम्बादेवी असून 'कपर्दी' (कवड्डिय) हा 'यक्ष' आहे.
‘कालकाचार्यकथानक' या विषयावर प्राकृतामध्ये अनेक खंडकाव्ये दिसून येतात. उज्जैनीचा राजा गर्दभिल्ल, त्याने केलेले कालकसूरींच्या 'सरस्वती' नावाच्या बहिणीचे अपहरण, त्यांनी घेतलेले शक (शाखि) राजांचे सहाय्य इ. घटना जैनांमध्ये प्रचलित आहेत. हे कालकसूरी विहार करीत प्रतिष्ठानपुरास आले. सातवाहनाने मोठ्या थाटाम प्रवेश करविला. त्यावेळी इंद्रमहोत्सव सुरू होता. पर्युषणपर्वात नेहमी येणारी अडचण जाणून सातवाहन व कालक यांनी एकत्रितपणे पर्युषणपर्वसांगता 'चतुर्थी 'ला करावी असा निर्णय घेतला. प्रतिष्ठान नगर या घटनेचे साक्षीदार आहे. उपलब्ध पुराव्यानुसार सुमारे ४ थ्या शतकात होऊन गेलेल्या पादलिप्त- पालित्तय- या आचार्यांचाही प्रतिष्ठानच्या इतिहासाशी संबंध वर्णिला आहे. पादलिप्ताचार्य 'दक्षिणाशामुखभूषण' अशा प्रतिष्ठान नगरात आले. सातवाहनाच्या दरबारातील लोकांनी तुपाने भरलेले भांडे पाठवणे - पादलिप्तांनी त्यात सुई टाकून कुशाग्रता सिद्ध करणेइ. घटना वर्णिल्या आहेत. त्यांच्या 'निर्वाणकलिका' आणि 'प्रश्नप्रकाश' या ग्रंथांचा उल्लेख आहे. आज अजूनपर्यंत त्यांची हस्तलिखिते सापडलेली नाहीत. सातवाहनाच्या राज्यातच त्यांनी 'तरंगलोला' नावाचे अप्रतिम काव्य रचले. आज तेही उपलब्ध नाही. त्यावर आधारित काव्ये मात्र उपलब्ध आहेत. त्यामध्ये पादलिप्तांचा आदरपूर्वक उल्लेख केला आहे. सातवाहन म्हणतो, 'सर्वजण आपली स्तुती करतात. अमुक अमुक गणिका स्तुती करीत नाही. तिला स्तुती करायला लावा'. पादलिप्त योगसाधनेने श्वासनिरोध करतात. प्रेतयात्रा गणिकेच्या घरासमोरून जात असते. तिने तरंगलोला काव्य वाचून आस्वाद घेतलेला असतो. ती उद्गारते
"सीसं कहवि न फुटं जमस्स पालित्तयं हरंतस्स
जस्स मुहनिज्झराउतो तरंगलोला नई वूढा ।।”
उज्जैनी (अवंती) चे विक्रमादित्य आणि सातवाहन राजे यांचा परस्परसंबंध सांगणारी कथाही या प्रतिष्ठानकल्पात येते. उज्जैनीत भविष्यवेत्ते घोषित करतात की, 'प्रतिष्ठानला सातवाहन राजा होणार आहे. दरम्यान सातवाहनाचे बुद्धिकौशल्य व पराक्रम उज्जैनीत समजतो. विक्रमादित्य आक्रमण करतो. सातवाहन अद्भुत शक्ती व पराक्रमाने त्यांना पळवितो. सातवाहनाचा राज्याभिषेक होतो. तो तापी नदीपर्यंत राज्यविस्तार करतो. ५० जिनमंदिरे बांधतो.