________________ शतकापासून ते दहाव्या शतकापर्यंत, सर्व प्रकारच्या यज्ञांना होणाऱ्या विरोधाची धार, हळुहळू अधिकाधिक तीव्र होत गेली. धर्मोपदेशमालाविवरण ग्रंथात, यज्ञाला स्पष्टत: नरकगतीचे कारण मानले आहे.४४ __ हिंसक यज्ञाच्या विरुद्ध दिलेल्या या तीव्र प्रतिक्रियांमुळे, ब्राह्मण परंपरेला यज्ञाचा पुनर्विचार करावा लागला. हिंसक यज्ञाचे प्रचलन कमी कमी होऊ लागले. यज्ञचक्रप्रवर्तनाचा पुरस्कार करणाऱ्या भगवद्गीतेलाही, द्रव्ययज्ञाबरोब्य ज्ञान, स्वाध्याय, तप इ. ची गणना यज्ञात करावी लागली. दहाव्या शतकानंतर ब्राह्मणधर्माच्या प्रभावाने, यज्ञपद्धती पूजारूपात व क्रियाकाण्डात्मक रीतीने जैनधर्मात येऊ लागली. आजही जैनांमध्ये मोठ्या प्रमाणात यज्ञाचे आयोजन होत नसले तरी छोटे होम, गृहस्थांच्याद्वारे केले जातात. शिवाय हिंदू धर्माच्या सानिध्याने विवाह प्रसंगी अमिहोम हा केला जातोच. अशा प्रकारे जैन व हिंदू समाजात अनेक बाबतीत आचाराचे आदान-प्रदान चालू असलेले दिसते. * अवतारवाद * अवतारवाद प्रामुख्याने हिंदू पुराणग्रंथात स्पष्टपणे मांडला गेला. भगवान विष्णूने साधूंच्या परित्राणासाठी आणि दुष्टांच्या निर्दालनासाठी अवतार घेणे आणि अवतार कार्य संपताच निजधामी परत जाणे',४५ ही संकल्पना पुराणांनी हिंदू मनात खोलवर रूजवली. जैन परंपरेत मात्र सर्व तीर्थंकर, जिन, केवली हे मनुष्ययोनीत जन्मतात व स्वत:च्या आत्मिक विकासाने निर्वाणपदास जातात. सिद्धगतीत गेल्यावर हे जीव पुन्हा जगाच्या अनुकंपेने परत भूतलावर अवतरत नाहीत. ___ बौद्धधर्म हा स्वतंत्रधर्म असूनही, गौतमबुद्धांना पुराणांनी दहा अवतारात स्थान दिले. त्याची कारणे काहीही असोत. महावीरांचा मात्र हिंदुग्रंथात विशेषतः पुराणात, कोठेही नामनिर्देश सुद्धा नाही. भागवतपुराणात ऋषभदेवंचा 24 अवतारात समावेश केला गेला, कारण त्यांची प्रवृत्तिपरकता आणि एकंदर जीवनक्रम पुराणकारांना हिंदुधर्मासारखा वाटला असावा. भगवान महावीरांना मात्र पौराणिकांनी आपलेसे केले नाही. याचाच अर्थ असा की, महावीरवाणीसू प्रकट होणारी विचारधारा, पौराणिकांना मानवली नसावी. शिवाय महावीरांचा दृष्टिकोण टीका व उपहासात्मक नसल्यामुळे, त्यांना ते दखलपात्र वाटले नसावेत. शिवाय ज्या काळात गौतमबुद्धाला अवतार म्हटले गेले, त्याकाळात बौद्धधर्माचा प्रसार अधिक झाला असावा. ऋषभदेवांचा अवतारात समावेश असणे व महावीरांचा अवतारात समावेश नसणे, यातील कोणती गोष्ट श्रमणधर्माच्या स्वतंत्रतेला पोषक आहे व कोणती पोषक नाही, हा विचार करण्यायोग्य मुद्दा आहे. * पितर संकल्पना * पितर, पिंड, श्राद्ध इ. संकल्पना वैदिक परंपरेत, ऋग्वेदापासून सर्व वेद, तैत्तिरीय ब्राह्मण व आरण्यक, छांदोग्यासारखी उपनिषदे, मनु, याज्ञवल्क्य इ. स्मृतिग्रंथ, कौटिलीय अर्थशास्त्र, रामायण, महाभारत, जवळजवळ सर्व पुराणे आणि पूर्वमीमांसा दर्शन या सर्वांमध्ये दिसून येते. श्राद्धविधिविषयक स्वतंत्र ग्रंथनिर्मितीही झालेली झिते. भारतातल्या सर्व प्रदेशात, सर्व जातिजमातींमध्ये पितर संकल्पना आणि त्याच्याशी जुळलेले श्राद्ध इ. विधी केले जातात. जैन परंपरेने हिंदू संस्कार, व्रतवैकल्य, पूजाअर्चा हे सर्व विधी थोड्याफार फरकाने आत्मसात केले असले तरी, पितर संकल्पना ही जैन सिद्धांताच्या पूर्ण विपरीत असल्याने स्वीकारली नाही. जैन दार्शनिक मान्यतेनुसार मनुष्यगतीतील जीव पुढील जन्मात देव, मनुष्य, नारकी किंवा तिर्यंच कोणत्याही रूपाने आपल्या कर्मानुसार जन्मते. शिवाय वर्तमान जन्म व पुढचा जन्म यामध्ये फक्त काही समयाचेच (क्षणाचे) अंतर असते.त्यामुळे मधील काळात पितृलोक नावाच्या ठिकाणी वसती करणे इ. संकल्पना, जैन दर्शनात बसत नाही. द्रव्य-क्षेत्र-काल-भाव-भव अशा पंचविध संसारात, प्रत्येक जीव इतर जीवांच्या अनेक वेळा संपर्कात येऊन, क्रमाक्रमाने माता-पिता-पुत्रकन्या इ. झालेला आहे. हिंदू दृष्टीने ज्या तीन पिढ्यातील पितरांना तर्पण इ. केले जाते, ते जीव जैन दृष्टीने केव्हाच