________________ * समन्वयवादी दृष्टिकोण * नयवाद, स्याद्वाद, अनेकान्तवाद आणि समन्वयवाद हे जैन अभ्यासकांच्या मते, जैन परंपरेचे वैशिष्ट्य आहे. सर्व दार्शनिक प्रवाहांना जैनांनी एकेक नय स्पष्ट करणारा वाद म्हणून सामावून घेतले. 'ऋषिभाषिता'सारख्या ग्रंथात हिंदू आणि बौद्ध विचारवंतांचाही गौरव केला. सामान्य जीवन आणि अध्यात्म यांचा समन्वय व्यवहारनय आणि निश्चयनय सांगून केला. कार्य-कारण भावाचे स्पष्टीकरण देत असताना, कोणतेही कार्य स्वभाववाद, कालमद, पौरुषवाद, कर्मवाद व नियतिवाद या पाचांच्या समन्वयाने होते, असे सांगितले. जैनांचा उदारमतवाद दर्शविणारी अनेक उदाहरणे अशाप्रकारे देता येतील. परंतु याच बरोबर असेही लक्षात ठेवले पाहिजे की वैदिक म्हणा, ब्राह्मण म्हणा अथवा हिंदू म्हणा या परंपरेनेही तडजोड, बदल, परिवर्तने काळाच्या ओघात स्वीकारलेली दिसतात. ऋषभदेवांना आणि गौतमबुद्धांना पुराणांनी अवतारपद दिले. पशुबलीप्रधान यज्ञ कालांतराने हिंसारहित बनले. स्वाध्याय, ज्ञान, तप इ. ना यज्ञाचा दर्जा दिला.३८ शंकराचार्यांसारख्या अद्वैत वेदांताने प्रातिभासिक, व्यावहारिक आणि पारमार्थिक अशा तीन सत्तांचा सिद्धांत मांला. कोणतेही कार्य पाचांच्या समवायाने होते, हे विधान तर भगवद्गीतेत जसेच्या तसे आहे.३९ वेदांपासून आरंभ झालेली ही परंपरा, प्रथम ब्राह्मण परंपरा म्हणून परिवर्तित झाली व नंतर तीच पुराणकाली भक्तिप्रधान झाली. म्हणजे द्रव्य-क्षेत्र-काल-भावाचा सिद्धांत फक्त जैनांनीच मांडला, असा अभिनिवेश सोडून देणे आवश्यक आहे. आता एकगोष्ट मात्र खरी की, कोणतेही विधान फक्त विशिष्ट अपेक्षेनेच सत्य असते, असे म्हणून आणि सद्वस्तूला अनंत धर्मात्मक मानून जैनांनी सापेक्षतावाद आणि अनेकांतवाद, सैद्धांतिक रूपाने यथार्थतेने मांडला. त्यासाठी ‘आइनस्टाइन' सारख्या वैज्ञानिकानेही जैनांबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.४० यातील खरी मेख अशी आहे की, या सापेक्षतावादात दडलेली वैज्ञानिक समीकरणे व सूत्रे जैनही तयार करू शकले नाहीत व हिंदूही तयार करू शकले नाहीत. * स्त्रीविषयक दृष्टिकोण * मध्ययुगापर्यंतच्या काळात हिंदुधर्मात व समाजात, स्त्रियांचे स्थान अतिशय दुय्यम होते, असे अभ्यासक म्हणतात. जैन धर्माने प्रथमपासूनच साधुंबरोबर साध्वींना व श्रावकांबरोबर श्राविकांनाही संघात स्थान दिले. शिवाय बोलीभाषेत उपदेश देऊन, स्त्रियांनाही समजू शकेल अशा भाषेत धार्मिक कार्य केले. महावीरांचे चरित्र लिहताना अनेकांनी 'नारि जाती के उद्धारक' असा त्यांचा गौरव केलेला दिसतो. पण याबाबत असे म्हणावेसे वाटते की, महावीरांचे हे कार्य धार्मिक आणि आध्यात्मिक बाबतीत होते. आणि त्यातही कुंदकुंदांसारख्या दिगंबर आचार्यांनी स्त्री जन्मातून स्त्रीला मोक्ष नाही असेही नोंदविले आहे. जैन स्त्रीची कौटुंबिक आणि सामाजिक स्थिती मात्र भारतल्या हिंदू स्त्रीसारखीच होती. साध्वींना जरी धर्मात स्थान होते तरी साधूंच्या तुलनेने साध्वींना नेहमीच दुय्यम स्थानावर ठेवले गेले. आजतागायत साध्वींना दुय्यम लेखण्याची ही स्थिती कायम आहे. उत्तराध्ययनासारख्या अर्धमागधी ग्रंथात स्त्रीलिंगसिद्धा, पुरुषलिंगसिद्धा, नपुंसकलिंगसिद्धा असे उल्लेख येणे, ज्ञाताधर्मकथासारख्या ग्रंथात ‘मल्ली' ही स्त्री तीर्थंकर असणे,४२ जयंतीसारख्या बुद्धिमती श्राविकेचा सन्मानपूर्वक उल्लेख असणे, इ. उल्लेखांवरून असे म्हणावेसे वाटते की, आगमांमध्ये जैन स्त्रीचे स्थान दुय्यम असले तरी समकालीन हिंदू अगर बौद्ध स्त्रीपेक्षा त्यामानाने बरेच श्रेष्ठ होते. * यज्ञ संकल्पना * जैन ग्रंथात येणाऱ्या यज्ञविरोधी धोरणात, काळानुसार स्थित्यंतरे येत गेली, असे दिसून येते. आगमकाळात यज्ञाला स्पष्टत: विरोध न करता, हिंसा-अहिंसेच्या विवेचनातून तो व्यक्त होतो. इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या