________________ 'रुद्र' हे, कालांतराने कैलासनिवासी शंकराचे पर्यायवाची नाव झाले.५ दैवत शास्त्राचे जसे बदलते स्वरूप दिसते, तसे यज्ञ संकल्पनेचेही बदलते स्वरूप आपल्याला वैदिक परंपरेत दिसते. आज ज्याला आपण हिंदुधर्म म्हणतो, तो स्पष्टतः देवीदेवतांच्या उपासनांवर आधारित असा भक्तिप्रधान धर्म आहे व तो अनेक संप्रदायांनी युक्त आहे. कालानुरूप बदल व परिवर्तने करून, जास्तीत जास्त लोकांना एकत्रितपणे टिकवून धरण्याचे काम, वैदिक परंपरेने केलेले दिसते. जैन परंपरेतही कालानुरूप परिवर्तने तर दिसतात पण षद्रव्ये, नवतत्त्वे, कर्मसिद्धांत, अनेकांतवाद आणि साधु व श्रावकाचार या मूळ गाभ्याला प्रदीर्घ कालावधीतही धक्का लागला नाही. परिवर्तने होत गेली तरी ती जैन परिभाषेत मांडायची झाली तर, पर्यायात्मक परिवर्तने आहेत द्रव्यात्मक नाहीत. पार्श्वनाथप्रणित चातुर्यामधर्म महावींनी पंचयाम केला. संघात सचेलक व अचेलक दोहोंनाही स्थान दिले. आजघडीला मंदिरमार्गी जैनांवर स्पष्टत: हिंदुधर्माच्या पूजाविधीचा प्रभाव दिसतो. तरीही षद्रव्ये, नवतत्त्वे इ. वरील सर्व मुद्दे अबाधित राहिले आहेत. पूजास्थानी आदर्शत् म्हणून वीतरागी जिनांचीच स्थापना केली जाते. बदलत्या काळानुसार सर्वस्वी वेगवेगळी नवीन आराध्य दैवते निर्माण झाली नाहीत. * मोक्ष व मोक्षमार्ग * ___ वैदिक परंपरा असो अथवा जैन परंपरा असो, दोन्ही भारतीय संस्कृतीचीच अपत्ये असल्याने, त्यांमध्ये नातिपालनाइतकेच (ethics) आध्यात्मिकतेलाही (spiritualism) महत्त्व राहिले. त्यामुळे दोहोंनीही मानवी आयुष्याचे अंतिम ध्येय मोक्षच मानले. परंतु यातही फरक असा आहे की, जैन परंपरेने प्रारंभीपासूनच मोक्ष पुरुषार्थाला अधेखित केले आहे तर अभ्यासक असे म्हणतात की, धर्म, अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थांनाच वैदिक परंपरेत आरंभी प्राधान्य होते. श्रमण परंपरेच्या प्रभावानेच मोक्ष हा पुरुषार्थ, महाभारत काळापासून प्रामुख्याने नजरेसमोर आला. सांख्यमार्ग अथवा ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, निष्कमकर्मयोगमार्ग अथवा ध्यानमार्ग अशी मोक्षाकडे नेणाऱ्या मार्गांची विविधता आणि त्यांची स्वतंत्रता, हे वैदिक परंपरेचे वैशिष्ट्य आहे. भगवद्गीतेतील अध्यायांच्या नावांवरूनसुद्धा हे स्पष्ट होते. जैन परंपरेने मात्र आरंभापासूनच 'सम्यग्दर्शनज्ञानचारित्राणि मोक्षमार्गः / ' हे सूत्र स्वीकारले. परंतु हे तीन वेगवेगळे मार्ग नसून, तिन्हींची समन्वित आराधनाच मोक्षमार्गात अपेक्षित आहे, असे प्रतिपादन केले आहे. * ईश्वर संकल्पना* वैदिक परंपरेतील विविध ग्रंथात, ईश्वर संकल्पनेविषयी संभ्रमावस्था दिसते. वेदात देवदेवता असल्या तरी त्यांना नक्की देव अथवा ईश्वर असे संबोधित केलेले नाही. ब्राह्मणग्रंथात अनेकदा 'यज्ञो वै देवः' असे वर्णन दसते. 'कस्मै देवाय हविषा विधेम ?' असाही प्रश्न उपस्थित केलेला दिसतो. रामायण व महाभारताच्या अखेरच्या भागात, त्यांना देवत्व आलेले दिसते. पुढे पुराणकाळात तर त्यांची अवतारातच गणना झाली. सांख्य दर्शनात पुरुषांचे असंख्यत्व सांगितले असले तरी, ईश्वराला स्वतंत्र स्थान नाही. योगदर्शनात मात्र क्लेशकर्मविपाकाशयैरपरामृष्टः पुरुषविशेष ईश्वरः / 11 अशी ईश्वराची व्याख्या दिली आहे. पण ते एक की अनेक याबाबत योगदर्शन मौन पाळते. __ वैदिक परंपरेतील पुराण ग्रंथात उत्पत्ती, स्थिती व प्रलयाचे प्रवर्तक असे तीन देव मानलेले दिसतात. आज प्रचलित हिंदुधर्मात ब्रह्मा, विष्णु व महेश या तीन देवतांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ___ जैन परंपरेने आरंभापासूनच सृष्टीच्या कर्ता-धर्ता-विनाशका ईश्वराची संकल्पनाच मानलेली नाही. सृष्टीला अनादि-अनंत मानून, जीवांचे नियंत्रण करणारे तत्त्व म्हणून, कर्मसिद्धांताला अग्रस्थानी ठेवले आहे. जैन परंपरा अंतिम शुद्ध अवस्था प्राप्त केलेल्या सर्व जीवांना, परमात्मा अथवा ईश्वर या नावाने संबोधते. पण हे ईश्वर सृष्टीची उत्पत्ती, पालन इ. कशामध्येही सहभाग घेत नाहीत. त्यांचे चैतन्यमय अस्तित्व मात्र सतत असते.