________________ 19. जैन आणि हिंदू धर्म : साम्य-भेदात्मक निरीक्षणे (ब्रह्ममहतिसागर जैन साहित्य संशोधन केंद्र : दहिगांव आणि जैन अध्यासन पुणे विद्यापीठ, यांच्या संयुक्त विद्यमाने __ आयोजित चर्चासत्रात वाचलेला शोधनिबंध, मार्च 2010) लेखक : डॉ. अनीता बोथरा मार्गदर्शक : डजें. नलिनी जोशी प्रस्तावना: 'जैन व वैदिक परंपरा : साम्य-भेदात्मक निरीक्षणे', हा विषय एका मोठ्या प्रबंधाचाच विषय आहे. तथापि सुमारे गेल्या 15 वर्षातील वाचन व चिंतनातून, जैन व वैदिक परंपरा यांच्या साम्य-भेदांवर आधारित, जी निरीक्षणे डोळ्यासमोर आली, ती संक्षेपाने एकत्रित नोंदविण्यासाठी, हा शोधलेख लिहण्याचा प्रयास केला आहे. __ गेली किमान पाच वर्षे तरी, भारतभरातल्या अनेक सेमिनार आणि कॉन्फरन्सेसला जाऊन, जैन आणि वैदिक परंपरांमधील मुद्यांवर आधारित असे, तौलनिक शोधलेख प्रस्तुत केले. त्यावेळी असा अनुभव आला की, वैदिक, हिंदु व ब्राह्मण या तीनही शब्दांवर, अनेकदा आक्षेप घेतले गेले. जैन, बौद्ध आणि आजीवक या तीन विचारधारा, निश्चितपणे श्रमण परंपरेच्या मानल्या जातात. त्या सोडून वेदांपासून चालू होऊन ब्राह्मण, आरण्यक, उपनिषदे, रामायण, महाभारत, सहा दर्शने आणि शैव, वैष्णव इ. संप्रदाय, या सर्वांना एका विचारधारेत गुंफून, त्याला आम्ही वैदिक, हिंदू व ब्राह्मण संप्रदाय असे संबोधतो. साम्य-भेदात्मक निरीक्षणे * प्रवृत्तिपरकता आणि निवृत्तिपरकता * अतिशय साकल्याने अर्थात् संग्रहनयाने विचार केल्यास, जैन परंपरा व एकंदरीतच श्रमण परंपरा या, निवृत्तिगामी आणि वैराग्य व तपाला प्राधान्य देणाऱ्या आहेत. वैदिक परंपरा प्राधान्याने, प्रवृत्तिगामी आणि ऐहिक जीवनाला प्राधान्य देणारी आहे. जैन परंपरेने नेहमीच साधुधर्म हा प्रधान मानून, अग्रस्थानी ठेवला आहे. अमृतचंद्राचार्यांनी यावर 'पुरुषार्थसिद्धयुपायात' चांगलाच प्रकाश टाला आहे. याउलट वैदिकांचे स्मृति इ. आचारविषयक ग्रंथ प्रामुख्याने गृहस्थधर्मालाच केंद्रस्थानी ठेवतात. जैन परंपरेत श्रावकाचार अर्थात् गृहस्थाचार देखील विस्ताराने सांगितला आहे. तरीही श्रावकाच्या प्रत्येक व्रतांमध्ये परिणाम अर्थात् मर्यादेला महत्त्व दिले आहे.४ वैदिक परंपरेतही तत्त्वचिंतनाला प्राधान्य देणारी उपनिषदे आणि संन्यासधर्माचे विवेचन करणारे ग्रंथ अर्थातच आहेत. तरी बहुसंख्येने असलेल्या गृहस्थांसाठी यज्ञ, पूजा-अर्चा, सण-वार, व्रत-वैकल्य यांच्या रूपाने एकंदर आचारातून प्रवृत्तिप्रधानतेचाच ठसा उमटतो. * कालानुरूप बदल * वैदिक परंपरेतील दैवतशास्त्राकडे नजर टाकली तर असे दिसते की, ऋग्वेदापासून ते उत्तरकालीन पुराणांपर्यंत त्यांचे दैवतशास्त्र विकसित होत राहिले. इंद्र, वरुण, रुद्र, विष्णु, उषा अशा वैदिक देवतांपैकी काही लोप पावत्या तर काहींचे व्यक्तिमत्व वेगवेगळे अंश मिसळून बदलत गेले. म्हणूनच वेदातील शिपिविष्ट 'विष्णु' हा, पुराणातील अवतारधारी विष्णुपेक्षा पूर्णत: बदलून गेलेला दिसतो. त्याचप्रमाणे ऋग्वेदामध्ये वादळी वाऱ्यांची देवता असलेले