________________ 18. भ. महावीरांचे तत्त्वज्ञान : आधुनिक संदर्भात (जैन-मराठी-साहित्य-संमेलनातील विशेष व्याख्यान, मिरज, मे 2003) 25 एप्रिल 2002 ला संपणारे वर्ष भ. महावीर जन्मकल्याणक वर्ष म्हणून सर्व भारतभर व संपूर्ण जगभर मोठ्या थाटामाटाने साजरे झाले. भव्य मेळावे, दिमाखदार उत्सव, भाषणे, प्रदीर्घ चर्चासत्रे, पुस्तकांचे प्रकाशन समारंभ, मिरवणुका, पूजा, अभिषेक, स्पर्धा, पुरस्कार अशा अनेकविध अंगांनी हे वर्ष साजरे झाले. जैन धर्म व तत्त्वज्ञानाच्या श्रेष्ठतेचा उद्घोष करणाऱ्या आवेशमय भाषणांचा एकंदर सूर पुढीलप्रमाणे होता - ‘दहशतवाद व युद्धसदृश परिस्थिीत जगाला अहिंसाच तारणार आहे. अहिंसा जैन विचारांची विश्वाला अमोल देणगी आहे. म. गांधींनी तिचा यथायोग्य वापर केला.नयवाद व अनेकान्तवाद जैन धर्माचे हृदय आहे, पंचमहाव्रते हे पंचप्राण आहेत. हा धर्म वैश्विक धर्म होण्याच्या योग्यतेचा आहे. शाकाहार व व्यसनमुक्तीच्या चळवळींच्या रूपाने हा परदेशातही घरोघरी रूजत चालला आहे. हा धर्म पूर्णांशाने वैज्ञानिक आहे. यात नाही असे जगात काहीच नाही.' इ.इ. महती गाणे, विशेषणे लावणे अथवा वर्णनेंकरणे अतिशय सोपे असते. थोडे भाषाकौशल्य व वक्तृत्व असले की घणाघाती विधानांनी तास-दोन तास व्यासपीठ गाजवणं काही फारसे अवघड नाही. जैन धर्माचा व तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी जास्तीत जास्त (विशेषतः अजैन) व्यक्तींना तो पटवून देणे आवश्यक आहे. 'गृहमयूर' बनून स्वत:च्याच पिसाऱ्यावर मोहित होण्यापेक्षा, या धर्माच्या श्रेष्ठतेची कारणमीमांसा देता येणे फार महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अगर वैश्विक पातळीवर पोहोचण्यापूर्वी आपण वेचक 12 मुद्यांच्या सहाय्याने, याच्या विशष्ट्यांची नोंद आधुनिक व विशेषतः वैयक्तिक संदर्भात घेऊ. व्यक्तिश: या तत्त्वाचे पालन करणे व ज्ञान मिळविणे अतिशय जरूरीचे आहे, भाषणबाजी नव्हे. 1) केवलिप्रज्ञप्त परिपूर्ण धर्म : जैन धर्म व तत्त्वज्ञानाच्या इतिहासात डोकावता, असे दिसते की, बौद्ध धर्माप्रमाणे हा व्यक्तीप्रवर्तित नाही व वैदिक धर्माप्रमाणे विकसनशीलही नाही. महावीरच नव्हे तर ऋषभदेवांच्या काळापासून हा केवलिप्रज्ञप्त' आहे. तत्त्वज्ञान व मूल आचरणाच्या गाभ्यात आजतागायत नवी भर पडलेली नाही. उलट, क्षुल्लक गोष्टींचे निमित्त करून संप्रदाय निर्माण करण्याची गर्हणीय गोष्ट आम्ही अनेक शतके करीत आलो आहोत. श्वेतांबर, दिगंबर, त्यातही स्थानकवासी, मूर्तिपूजक, तेरापंथी, वीसपंथी, सोळापंथी अशा संप्रदायानिशी फुटीर स्वरूपात जैन धर्म विश्वाला सामोरा गेला, तर आपल्या एकसंध केवलिप्रज्ञप्त परिपूर्ण अनादि धर्मावर कोणी विश्वास तरी ठेवेल का ? 'स्वत:च्यर सुधारा व मगच आम्हाला सुधारा' असे जग आपल्याला नाही का म्हणणार ? 2) धर्माची भाषा कोणती असावी ? : संस्कृत भाषेचा आधार न घेता, लोकभाषा असलेल्या 'अर्धमागधी' नावाच्या प्राकृतात उपदेश देऊन महावीरांनी धर्मभाषेविषयीचा एक कायमचा दंडक घालून दिला, महावीरांचे भाषाविषयक कार्य पुढील 6 ओळीत परिणामकाकपणे सांगता येईल - धर्म आणि जीवनाची फारकत ही जाहली / घेउनी ध्यानी जिनांनी गोष्ट ही हो साधली / / संस्कृताची बंद दारे धाडसाने उघडली / आणि त्यातुनि लोकभाषा सहज केली वाहती / /