________________ ऋषभं मासमानानां सपत्नानां विषासहिम् / हत्तारं शत्रूणा कृधि, विराजं गोपतिं गवाम् / / (ऋ. 10/166/1) तसेच त्यांचा उल्लेख अथर्ववेदात (ऋचा 19/42/4) व तैत्तियारण्यकात (ऋ. 2/7/1) मध्येही आढळतो. भागवत पुराणात ऋषभदेवांना 24 अवतारांपैकी एक अवतार मानले आहे. त्यातल्या रजसा उपप्लुतो अयं अवतार: / ' या उद्गारात ऋषभदेवांचा धुळीने माखले असण्याचा उल्लेख आहे. भगवान ऋषभदेवांची स्तुती मनुस्मृतीमध्येही खालीलप्रमाणे आढळते. अष्टषष्टिवु तीर्थेषु यात्रायां यत्फलं भवेत् / श्री आदिनाथस्य देवस्य स्मरणेनापि तद्भवेत / / त्याचप्रमाणे शिवपुराण, आग्नेयपुराण, ब्रह्माण्डपुराण, विष्णुपुराण, नारदपुराण आदि पुराणातही ऋषभदेवांचा उल्लेख तर आहेच. त्याचबरोबर त्यांच्या जीवनातल्या घटनाही दिल्या आहेत. (2) मोहनजोदारो (इ.स.पू. 6000) याच्या उत्खननात ऋषभदेवांची मूर्ती सापडली होती. ती मूर्ती ऋषभदेवांची होती हे अशाकरिता की मूर्तीच्या खाली वृषभाची आकृती होती जी त्यांची खूण आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ऋषभदेवांचा काळ हा मानवाच्या सुसंस्कृतपणाच्या सुरवातीचा काळ होता हे मान्य करावे लागते. त्यावरून त्यांचे प्राचीनत्व सिद्ध होते. इतर निरीक्षणे : 24 तीर्थंकरांपैकी केवळ ऋषभदेवच असे तीर्थंकर होऊन गेले की ज्यांनी अष्टापद अर्थात् कैलास पर्वतावर अंतिम तपस्या करून तेथून निर्वाणपद प्राप्त केले. त्यांचे जटाधारी स्वरूप, कैलास पर्वतावरील ध्यानस्थ अवस्था, नंदीशी असणारे वृषभाचे चिह्न तसेच वृषभदेवांना जसा पिता, पत्नी, पुत्र असा परिवार होता तसाच पौराणिक शंकरालाही होता. त्याचप्रमाणे शंकराचा स्मशाननिवास आणि भस्मलेपन हे अंशही ऋषभदेवांच्या वर्णनातून घेतले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जैन अभ्यासकांचे असे मत आहे की ऋषभदेवांच्या व्यक्तिमत्वाचे काही अंश उत्तरकालीन, पौराणिक शिव देवतेच्या वर्णनात समाविष्ट केले असावेत. प्रत्येकबुद्ध अथवा स्वयंसंबुद्ध राजे : __ गृहस्थाश्रमात राहून गुरूंच्या उपदेशाशिवाय, एखाद्या प्रसंगाचे किंवा वस्तूचे निमित्त होऊन काही राजे विरक्त झाले व त्यांना बोधि प्राप्त झाली. नंतर त्यांनी स्वत:च दीक्षा घेतली व लोकांना उपदेश न देता शरीराचा अंत करून ते मोक्षाला गेले. अशा राजांना प्रत्येकबुद्ध अथवा स्वयंसंबुद्ध असे संबोधले जाते. हे प्रत्येकबुद्ध एकाकी विहार करणारे असतात व ते गच्छावासात रहात नाहीत. उत्तराध्ययन या मूलसूत्राच्या 18 व्या अध्यायात चार प्रत्येकबुद्धांचा उल्लेख आढळतो. तो असा - करकंडु कलिंगेसु, पंचालेसु य दुम्मुहो / नमी राया विदेहेसु, गंधारेसु य नग्गई / / (उत्त.१८.४६) एए नरिंदवसभा, णिक्खंता जिणसासणे / पुत्ते रज्जे ठवित्ता णं, सामण्णे पज्जुवट्ठिया / / (उत्त. 18.47) अर्थात् कलिंग देशाचा करकंडु, पांचाल देशाचा द्विमुख, विदेह देशाचा नमीराजा तर गांधार देशाचा नग्गति राजा, हे चार श्रेष्ठ राजे आपल्या पुत्रांवर राज्यकारभार सोपवून जिनशासनात प्रव्रज्या घेते झाले व श्रमणधर्मात सम्यक प्रकाराने स्थिर झाले. श्वेतांबर संप्रदायात या चार प्रत्येकबुद्धांवर कथा दिलेल्या आढळतात. उत्तराध्ययन सूत्रावरील सुखबोधाटीका