________________ हे शलाकापुरुष असे आहेत. 24 तीर्थंकर : वृषभ, अजित, संभव, अभिनंदन, सुमति, पद्मप्रभ, सुपार्श्व, चंद्रप्रभ, सुविधि, शीतल, श्रेयांस, वासुपूज्य, विमल, अनंत, धर्मनाथ, शांतीनाथ, कुन्थु, अरह, मल्ली, मुनिसुव्रत, नमि, अरिष्टनेमि, पार्श्वनाथ, महावीर. 12 चक्रवर्ती : भरत, सगर, मघवा, सनत्कुमार, शांतिनाथ, कुन्थुनाथ, अरह, सुभौम, पद्म, हरिषेण, जयसेन, ब्रह्मदत्त. 9 वासुदेव : त्रिपृष्ठ, द्वयपृष्ठ, स्वयंभू, पुरुषोत्तम, पुरुषसिंह, पुरुषपुंडरीक, दत्त, नारायण, श्रीकृष्ण. 9 प्रतिवासुदेव : अश्वग्रीव, तारक, मेरक, मधुकैटभ, निसुम्भ, बलि, प्रहरण, रावण, जरासंध. 9 बलदेव : वितय, अचल, धर्म, सुप्रभ, सुदर्शन, नंदी, नंदिमित्र, राम, बलभद्र. जैन पौराणिक ग्रंथात अनेक राजांचा उल्लेख आढळतो. प्राय: हे राजे चार प्रकारात आढळतात. एक म्हणजे आपल्या राज्याचा, संपत्तीचा त्याग करून, दीक्षा घेऊन लोकांना धर्मोपदेश देणारे. यात तीर्थंकरादि व्यक्ती येतात. उदा. ऋषभदेव, अरिष्टनेमी, पार्श्वनाथ, महावीर इ. दुसरे म्हणजे गृहस्थाश्रमात राहून काही एका विशिष्ट प्रसंगाने प्रतिबोधित होऊन स्वत:च दीक्षा घेणारे व मोक्षाला जाणारे मोक्षगामी पुरुष. यात प्रत्येकबुद्ध येतात. उदा. करकंडु, नमीराजा, नग्गतिराजा, द्विमुखराजा, शालिभद्र इ. तिसरा प्रकार म्हणजे राजपदावर राहून पण जैन धर्म स्वीकारून धर्माचा प्रसार करणारे व धर्माचा आधारस्तंभ झालेले राजे. हे राजे चांगले आचरण करीत प्रजेला सन्मार्ग दाखवितात या प्रकारात चंद्रगुप्त मौर्य, खारवेल, राजा श्रेणिक (बिंबिसार), कुणिक (अजातशत्रू), जितशत्रू, कुमारपाल आदि राजे येतात. चौथ्या प्रकारात राजे दीक्षा घेतात पण धर्मोपदेश न करता एकांत स्थळी जाऊन तपश्चर्या करतात व आत्मोन्नती साधतात. प्रत्येक प्रकारातील एक एक उदाहरण पाया. जैनांचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव : अयोध्या नगरीचे 14 वे अंतिम कुलकर नाभिराजा व राणी मरुदेवी यांच्या पोटी ऋषभदेवांचा जन्म झाला. नाभिराजा मरण पावल्यावर ते राजे बनले. पण सर्वांना ते परिचित आहेत ते त्यांच्या कार्यामुळे. सर्व मानवजातीला सुसंस्कृत करण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या काळी मानवजात प्रगत नव्हती. लोक झाडाखाली झोपत. कंदमुळे खात. लोकांचे जीवन कर्तव्यशून्य व निष्क्रिय होते. लोकसंख्येची वाढ झाली होती. त्यामुळे भांडणे, वैर, घृणा, संघर्ष अशा अपप्रवृत्ती आढळून येऊ लागल्या होत्या. ऋषभदेवांनी या लोकांमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणला. त्यांना शेती करण्याची, वस्त्रे विणण्याची कला शिकविली. स्वत: विनीता नगरी (आताची अयोध्या) निर्माण करून नगर, गाव कसे निर्माण करावे हे शिकविले. स्वत: दोन राण्यांशी - सुनंदा व सुमंगला यांच्याशी विवाह करून विवाहसंस्था अस्तित्वात आणली. आपल्या कन्या ब्राह्मी व सुंदरी यांना शिक्षण देऊन स्त्री शिक्षणाचा पाया घातला. स्त्रियांना मानाचे स्थान दिले. जातीनुसार नाही तर प्रत्येकाच्या कामानुसार क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी वर्णव्यवस्था अस्तित्वात आणली. थोडक्यात त्यांनी लोकांना पुरुषार्थाचा धडा घालून दिला व निष्क्रियता नष्ट केली. मानवजात सर्वार्थाने प्रगत झाल्यावर आपला पुत्र भरत यास राज्यावर बसवून त्यांनी दीक्षा घेतली. श्रमण धर्माची स्थापना केली. साधु-साध्वी, श्रावक-श्राविका अशा चतुर्विध संघाची स्थापना केली. __ ऋषभदेवाचे नाव ऋषभ अथवा वृषभ अशा दोन्ही प्रकारे घेतले जाते. या त्यांच्या कार्यामुळेच जैनांबरोबर त्यांना वैदिक व बौद्ध धर्मात आदराचे स्थान मिळाले. (1) ऋग्वेदात त्यांचा उल्लेख जागोजागी आढळतो (ऋ. 10/166/1).