________________ कथा. धर्मकथेचे चार उपप्रकार सांगण्यात आले आहेत. मनाला अनुकूल ती आक्षेपणी' धर्मकथा, प्रतिकूल वाटणार 'विक्षेपणी', ज्ञान वाढवणारी 'संवेगजननी' आणि वैराग्य वाढवणारी 'निर्वेदजननी' धर्मकथा होय. स्त्री-पुरुष विलासांचे वर्णन 'रात्रिकथे'त येते. तसेच चौर्यकर्त्यांचे वर्णनही यात येते. भोजन-मेजवान्यांची रसभरित वर्णनं भोजनकथे'त येतात. स्त्रियांची रंगेलपणे केलेली वर्णने व व्यभिचार 'स्त्रीकथे'चा विषय असतो. युद्ध, हेरगिरी, कूट-कारस्थानं, बंडाळी यांची वर्णनं 'जनपदकथेत' किंवा 'राष्ट्रकथेत येतात. अशा कथा साधूसाध्वींनी रचू नयेत आणि ऐकूही नयेत - असा निर्बंध साधु-आचारात घालण्यात आला आहे. 'वसुदेवहिंडी' नावाच्या प्रवासवर्णनात्मक ग्रंथात - आख्यायिका-पुस्तक, कथाविज्ञान आणि व्याख्यान यांचं विशेष विवेचन केलं आहे. ___ जैन कथालेखकांनी, 'कथा मनोरंजक करण्यासाठी कोणते उपाय वापरावेत ?' - याचा विचार केलेला दिसतो. कथा अधिकाधिक आकर्षक बनण्यासाठी तिच्यात पुढील गोष्टी असणे आवश्यक आहे. जसे :- संवाद, बुद्धिपरीक्षा, वाक्-कौशल्य, प्रश्नोत्तर, उत्तर-प्रत्युत्तर, प्रहेलिका, समस्यापूर्ती, सुभाषित-सूक्ती, म्हणी-वाक्प्रचार, गीत-गीतिका-गाथा अशा विविध भाषातील पद्यरचना - इत्यादी इत्यादी. समोर असलेला श्रोतृवृंद कसा आहे, कोणत्या आर्थिक-सामाजिक स्तरातला आहे, त्याची मानसिक अवस्था व बौद्धिक पातळी कोणती आहे - हे सर्व ध्यानात घेऊन वक्त्याने कथेचा विषय निवडावा आणि निरूपणाची पद्धतही त्यानुसार ठरवावी - असे म्हटले आहे. अधम-मध्यम-उत्तम' - अशी श्रोत्यांची वर्गवारी केलेली दिसते. ___ अर्धमागधी भाषेत लिहिलेले 11 अंगग्रंथ श्वेतांबर जैन साहित्यात ‘महावीरवाणी' या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यातील सहावा ग्रंथ आहे ज्ञाताधर्मकथा'. सामान्य लोकांचा बौद्धिक स्तर लक्षात घेऊन या ग्रंथात अनेक धार्मिक तत्त्वं आणि सिद्धांत - कथा आणि दृष्टांताच्या माध्यमातून चित्रित करण्यात आली आहेत. यात एकूण 14 कथा आणि 5 दृष्टांत आहेत. प्रत्येक कथेत स्त्रियांचे चित्रण अग्रभागी असलेलं दिसतं. 'स्थापत्या' नावाची कर्तृत्ववान स्त्री, आपल्या मुलाच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय स्वतंत्रपणे आणि जबाबदारीनं घेताना दिसते. 'घरकामाची वाटणी चार सुनांमधे कशी करायची ?' हा दैनंदिन आयुष्यातला पेच सोडवण्यासाठी सासरेबुवा कोणती परीक्षा घेतात ? - याचा मनोरंजक वृत्तांत 'रोहिणी' नावाच्या कथेत येतो. चारही सुनांच्या शारीरिक व बौद्धिक क्षमता लक्षात घेतल्या जातात. माहेरच्या मंडळींच्या समक्ष परीक्षा घेतल्याने पक्षपाताची आशंका रहात नाही. कथेच्या अखेरीस महावी पाच महाव्रते धारण केलेल्या साधूला लावून दाखवतात. ‘सतत शंकाकुल असणाऱ्या माणसाचे कधी भले होत नाही' - असा बोध मोराच्या दोन अंड्यांच्या दृष्टांतातून मिळतो. 'नंदीफल' नावाच्या वृक्षाची फळे कशी खायला गोड आणि परिणामी विषारी आहेत - यासाठीचा संदर दृष्टांत इथं योजला आहे. तलावातला बेडूक आणि समुद्रातला बेडूक यांचा अप्रतिम संवाद याच ग्रंथात चित्रित करण्यात आला आहे. महाभारतात कोठेही न आलेली द्रौपदीच्या तीन पूर्वजन्मांची साखळीबद्ध कथा यात वाचायला मिळते. द्रौपदीचे अपहरण, पांडवांचे निर्वासन, पांडुमथुरा अर्थात् मदुराईची निर्मिती - असे अनेक कथाभाग्नाचकांना स्तिमित करतात. 'उत्तराध्ययन-सूत्र' हा ग्रंथ सामान्यतः ‘धम्मपद' या बौद्ध ग्रंथासारखा आहे. वेगळेपण इतकेच की त्यातले काही संवाद व आख्यानं अतिशय आकर्षक आहेत. स्वत:ला सर्व प्रजेचा नाथ' समजणारा राजा वस्तुतः स्वत: किती 'अनाथ' आहे - हे एक मुनी राजाला समजावून सांगताना दिसतात. 'राजीमती' नावाच्या अत्यंत तेजस्वी चारित्र्यवान स्त्रीचा वृत्तांत यातूनच समजतो. ___अर्धमागधी ग्रंथांवर नंतरच्या काळात जे स्पष्टीकरणात्मक साहित्य लिहिले गेले त्याला 'टीका-साहित्य' म्हणतात. हे समग्र टीकासाहित्य कथा-कहाण्यांचं जणू अक्षय भांडारच आहे. योग्य आणि अयोग्य शिष्यांसाठी सूप, चाळणी, घडा इत्यादी अनेक मनोरंजक दृष्टांत दिले आहेत. मनुष्यत्वाचे दुर्लभत्व सांगण्यासाठी जैन साहित्यात वारंवार दहा दृष्टांत दिलेले दिसतात. मंत्रवलेले फासे घेऊन द्यूत खेळणारा जुगारी, ढीगभर धान्यात मोहरीचे दाणे