________________ (उत्त.२२.४५, धम्म.१.२०) ; राखेत लपलेला अग्नी (उत्त.२५.१८, धम्म.५.१२) ; बेटासारखे स्थिर असणे (आचारांग 1.6.5.5, धम्म. 2.5) अशी शेकडो उदाहरणे देता येतील. भिडूंच्या आहाराविहाराविषयीची वाक्ये, शब्दयोजना वगैरेत पुष्कळच साम्य केवळ धम्मपदातच नव्हे तर इतर पाली व जैन प्राकृत ग्रंथातही आढळून येते. वरील साम्यस्थळे पहाणाऱ्यास कदाचित् असे वाटेल की दोन्ही ग्रंथ अगदी एका साच्यातून काढलेले दिसतात. काव्यमयता, सामान्य सदाचार, नीतिनियम, सुभाषितांची पखरण, जाता जाता सामाजिक परिस्थितीवर केलेले भाष्य इत्यादि बाबतीत दोन्ही ग्रंथात समानता असली तरी त्यांचे अंतरंग मात्र वेगळे आहे. धम्मपदापेक्षा उत्तराध्ययनाचे मल जाणवलेले वेगळेपण मांडण्याचा प्रयत्न येथे करते. उत्तराध्ययनात प्रत्येक अध्ययनाचा उद्देश, प्रतिपाद्य व पार्श्वभूमी निरनिराळी आहे. विषयांची अथवा कल्पनांची कोठेही पुनरावृत्ती नाही. काही अध्ययने केवळ उपदेशपर, काही तत्त्व व सिद्धांतप्रधान, काही कथात्मक, काही संवादात्मक तर काही सर्वस्वी आचारप्रधान आहेत. जैन विचारांचा कणा असलेले प्रायः सर्व सिद्धांत विविध अध्ययनात गोवले आहेत. विनय, परीषह, चतुरंग, अकाम-सकाम मरण, अष्ट प्रवचनमाता, सामाचारी, मोक्षमार्गगति, तपोमार्ग, कर्मप्रकृति, लेश्या आणि जीवाजीवविभक्ति ही काही नावे देखील उत्तराध्ययनाच्या मौलिक सिद्धांतदृष्टीवर प्रकाश टाकण्यास पुरेशी आहेत. वस्तुत: धम्मपदातून देखील त्रिरत्न, पंचशील, चार आर्यसत्ये, द्वादशनिदान, प्रतीत्यसमुत्पाद इ. प्रमुख बौद्ध सिद्धांतांचे मार्गदर्शन आपण अपेक्षितो. परंतु 1-2 गोष्टींचा अपवाद वगळता धम्मपद बौद्ध तत्त्वज्ञानाच्य गाभ्याला स्पर्श करू शकलेले नाही असेच म्हणावेसे वाटते. कदाचित् साध्या-सोप्या भाषेत सदाचरणाचा उपदेश हेच धम्मपदामागचे प्रयोजन असू शकेल. क्लिष्ट, पारिभाषिक शब्दयोजनेचा अभाव, साधे, सोपे नैतिक विचार आणि सुंदर भाषा यामुळे धम्मपदाला विलक्षण लोकप्रियता मात्र लाभली. धम्मपदाची संस्कृत, तिबेटी व चिनी संस्करणेही झाली. सिलोन, ब्रह्मदेश, थायलंड कंबोडिया ह्या देशातील तरुण भिडूंचा व गृहस्थाश्रमी उपासकांचाही हा नित्य पाठांतरातील ग्रंथ आहे. उत्तराध्ययनाच्या जैन अभ्यासकांनी पाली भाषेतील 'धम्मपदा'चा जरूर विशेष अभ्यास करावा यासाठी हा लेखन प्रपंच !! **********