________________ 20. उत्तराध्ययन आणि धम्मपद ('सन्मति-तीर्थ वार्षिक पत्रिका', जून 2008) जैन आणि बौद्ध या श्रमण परंपरेच्या दोन धारा आहेत. बौद्धांच्या मानाने जैन परंपरा कितीतरी अधिक प्राचीन आहे. जैनांचे आज उपलब्ध असलेले साहित्य मात्र ‘महावीरवाणी' या नावानेच प्रसिद्ध आहे. श्वेतांबर संप्रदाय अर्धमागधी भाषेतील 45 अगर 32 आगमग्रंथांना प्रमाण मानतो. त्यांचे अंग, उपांग असे 6 उपविभाग केले आहेत. त्यापैकी 'मूलसूत्र' या उपविभागात उत्तराध्ययन, आवश्यक व दशवैकालिकाचा समावेश होतो. उत्तराध्ययनसूत्राचा अभ्यास श्वेतांबर परंपरेत विशेषच केला जातो. त्यातील विषयांची विविधता, मांडणी, पद्यमयता, काव्यगुण यामुळे त्याची लोकप्रियताही खूप आहे. उत्तराध्ययनाचा अभ्यास केवळ त्या ग्रंथापुरताच न राहता, त्याला काही तौलनिक अभ्यासाचे परिमाण लाभावे अशी नव्या युगाच्या ज्ञानसंकेतांची मागणी आहे. वैचारिक कक्षा रुंदावत आहेत. परस्पंख्या संकल्पना समजावून घेणे ही सामाजिक गरजही निर्माण झाली आहे. श्रमणपरंपरेतील दुसरा प्रवाह ‘बौद्ध दर्शन' हे अनेक दृष्टींनी जैन मान्यतांशी मिळतेजुळते आहे. वेदांची मान्यता व सर्वश्रेष्ठत्व नाकारणे, हिंसक यज्ञांना विरोध करणे, जात्याधार चातुर्वर्ण्याचा निषेध, स्वतंत्र श्रामणिक साहित्याची निर्मिती, अशी काही प्रमुख साम्ये दिसतात. भ. महावीर व भ. गौतम बुद्ध हे प्राय: समकालीन. त्यांच्या कार्यप्रवृत्तही प्राय: समान प्रांतात राहिल्या. दोघांच्या धर्मभाषाही ‘मागधी' भाषेशी संबंधितच होत्या. उत्तराध्ययनाशी ज्या बौद्ध ग्रंथाचे बहिरंग व अंतरंग साम्य आढळते, असा ग्रंथ म्हणजे पाली भाषानिबद्ध धम्मपद' होय. दोन्ही ग्रंथ इसवी सनापूर्वी दुसऱ्या-तिसऱ्या शतकात अंतिम संस्करणाच्या स्वरूपात आले. धम्मपद हा काही कोणा एका व्यक्तीने लिहिलेला ग्रंथ नसून तो केवळ एक गाथा-संग्रह आहे. वेगवेगळ्या बौद्ध आचार्यांनी त्या निरनिराळ्या प्रसंगी लिहिल्या आहेत. गौतम बुद्धाच्या विचारसरणीच्या त्या निदर्शक असल्यामुळे, त्या बुद्धाच्या नावावर घातल्या गेल्या. सुप्रसिद्ध त्रिपिटकातील ‘सुत्तपिटक' भागात, 'खुद्दकनिकाय' हा उपविभाग आहे. त्यात एकूण 15 ग्रंथ आहेत. त्यापैकी एक ग्रंथ ‘धम्मपद' आहे. सुप्रसिद्ध जातककथाही ह्याच खुद्दकनिकायात आहेत जैन परंपरा उत्तराध्ययनास अंतिम महावीरवाणी मानते. तथापि त्याच्या 36 अध्ययनांपैकी काहीच अध्ययने महावीरकथित असून, काही परवर्ती जैन आचार्यांनी रचून त्यात घातली आहेत, हे तथ्य आता विद्वज्जगतात मान्य झालेले आहे. उत्तराध्ययनात 36 अध्ययने आहेत तर धम्मपदात 26 वर्ग (वग्ग) आहेत. उत्तराध्ययनामधील 'नमिप्रव्रज्या' या नवव्या अध्ययनातील दोन गाथा धम्मपदातील 'बालवग्ग' (7.11) आणि 'सहस्सवग्ग' (8.4) यातील दोन गाथांशी तंतोतंत जुळतात. 'युद्धात हजार पटींनी हजार माणसांना जिंकण्यापेक्षा, जा स्वत:स एकट्यास संयमपूर्वक जिंकतो, तो सर्वश्रेष्ठ होय'-हा विचार दोन्ही परंपरांनी शिरोधार्य मानला आहे धम्मपदातील पहिल्या ‘यमकवर्गातील परस्परविरोधी गाथांच्या जोड्या उत्तराध्ययनातील पहिल्या 'विनय' अध्ययनाची आठवण करून देतात. प्रमाद आणि अप्रमाद यांचे वर्णनही दोहोत समान आहे. धम्मपदात 'अप्पमादवग्ग' आहे तर उत्तराध्ययनामधील 10 व्या द्रुमपत्रक अध्ययनात ‘समयं गोयम मा पमायए' अशी सूचना गौतमस्वामींना वारंवार दिलेली दिसते. अज्ञानी व्यक्तीला 'बाल' आणि ज्ञानी व्यक्तीला दोन्ही ग्रंथात 'पंडित' अशी संज्ञा दिसते. 'तण्हावग्गा'त ज्या तृष्णेची निंदा केलेली दिसते, तोच आशय जहा लाहो तहा लोहो, लाहा लोहो पवड्डई' अशभाषेत उत्तराध्ययनामध्ये आढळतो. 'भिक्खुवग्ग' आणि 'सभिक्ख' अध्ययन यातील साम्य थक्क करणारे दिसते. दोहोतही काया-वाचा-मनाच्या संवराला (संयमाला) महत्त्व दिले आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा जन्मजात जातींचा विरोध करून दोन्ही ग्रंथात तं वयं बूम माहणं' अशा शब्दात खऱ्या ब्राह्मणाची लक्षणे दिली आहेत. भ. महावीर व बुद्ध यांची सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी समान असल्यामुळे दोन्ही ग्रंथात अनेक उपमा, दृष्टांतही समान दिसतात. वायने न हालणारा पर्वत (उत्त.२१.१९ ; धम्म.६.७); लोकांच्या गायी मोजणारा गुराखी