________________
* संपादकीय *
पुणे विद्यापीठातील जैन अध्यासनाच्या माध्यमातून गेली पाच वर्षे, क्रमाक्रमाने अर्धमागधी भाषेतील 'अंग-ग्रंथ' ‘सन्मति-तीर्थ' संस्थेच्या सक्रिय सहयोगाने, 'फिरोदिया सभागृहात' शिकविण्याचे कार्य मन:पूर्वक करीत आहे. जैन विद्येच्या क्षेत्रात १०-१२ वर्षे सन्मतीच्या माध्यमातून प्रगत अध्ययन केलेल्या सुमारे ८० प्रौढ स्त्री-पुरुषांनी या अभ्यासवर्गाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. अजूनही देत आहेत.
१५ जून २००९ ते १५ एप्रिल २०१३ या कालावधीत आचारांग (खंड १-२) आणि सूत्रकृतांग (खंड १ - २) या ग्रंथांतील वेचक भागांचा भाषिक, दार्शनिक आणि तौलनिक दृष्टीने समीक्षात्मक अभ्यास केला. प्रतिवर्षी, त्या अभ्यासक्रमावर आधारित अशी निबंध-वाचनाची सत्रे आयोजित करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याने वेगळा विषय घेऊन, त्या आगम-ग्रंथाचा वेगळा पैलू नजरेसमोर आणला. त्यावर योग्य ते संपादकीय संस्कार करून प्रस्तुत पुस्तक तयार केले आहे.
स्व. नवलमलजी फिरोदिया यांनी जैन अध्यासनास प्रकाशनासाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून हे पुस्तक प्रकाशित करीत आहोत. त्यांच्या स्फूर्तिप्रद स्मृतीला विनम्र प्रणाम ! आपल्या पित्याचे कार्य पुढे सुरू ठेवणाऱ्या मा. अभयजी फिरोदिया यांना, त्यांच्या अमूल्य सहकार्याबद्दल शतशः धन्यवाद !
डॉ. नलिनी जोशी प्राध्यापिका, जैन अध्यासन