________________
(९)
संसाराप्रती असलेला राग आणि संसारी पदार्थांच्या आसक्ती त्यात सुखबुद्धी ठेवणे राग आहे. राग जन्ममरणाच्या चक्रात जीवाला फिरवतो. म्हणून सर्व प्रथम रागरहित होणे आवश्यक आहे. वैराग्यभाव साधनेचा प्रथम पाया आहे. वैराग्यसहित साधनाच सफळ होते. प्रथम संसाराची हेयता, उदासिनता, अरुचिता झाल्यावर साधना सफळ होते. वैराग्य आल्यावर त्या वैराग्याला सतत टिकवून ठेवण्यासाठी चार योग भावनांचे चिंतन आवश्यक आहे. काही लेखकांनी बारा भावनांबरोबरच चार भावनांना जोडले आहे, तर काही लेखकांनी स्वतंत्र विवेचन केले आहे.
मैत्री, प्रमोद, करुणा व माध्यस्थ्य ह्या चार योगभावना धर्माला आत्म्याबरोबर जोडतात, दृढ करतात. म्हणून त्यांना योग भावना म्हणतात. या योग भावनांचे अध्यात्मिक महत्त्व तर आहेच, त्याचबरोबर यांच्या चिंतनाने मानवात खरी मानवता विकसित होते. ह्या भावना दृढ झाल्या तर ईर्ष्या, द्वेष आणि कलहासाठी काही स्थानच रहात नाही. राग-द्वेष, अभिमान आणि स्वार्थानेच जगात मोठ्या समस्या निर्माण होतात. ह्या भावना त्यांचे निर्मूलन करून पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करू शकतात. पण आवश्कयता आहे याचे निष्ठेने चिंतन करण्याची. समाज, राष्ट्र आणि धर्मासाठी उपयुक्त अशा चार योग भावनांचे या प्रकरणात वर्णन केले आहे. त्यामुळे आत्मशांती बरोबर विश्वशांतीपण निर्माण होऊ शकते इतक्या या भावना महत्त्वपूर्ण आहेत.
प्रकरण ७ अशुभापासून शुभ आणि शुभापासून शुद्धाची भावयात्रा'
या प्रकरणात अशुभ आणि शुभाचे पाप-पुण्य बंधात्मक स्वरूप आणि शुद्धभावना, शुद्धोपयोग कर्मनिर्जरा, कृत्स्न कर्मक्षय तथा मोक्षाचे तात्त्विक दृष्टीने निरूपण केले आहे. 'आत्मा' धर्म आणि दर्शन हे जगात चिंतनाचे महत्त्वपूर्ण विषय आहेत. आत्मा अनात्मा, जड, चेतनाचे चिंतन करून आत्मा शुद्ध चैतन्यस्वरूपी आहे असे चिंतन केले पाहिजे.
आत्मा अनादी काळापासून आहे. कर्मपण अनादी काळापासून आहे आणि दृश्य विश्वपण अनादी आहे. आत्म्याची उत्पत्ती पण नाही व नाश पण नाही. आत्मा त्रिकाळी शाश्वत आहे, असे अनंत आत्मे विश्वात आहेत. प्रत्येक आत्म्याचे मौलिक मूळ स्वरूप सारखेच आहे.
आत्मा जसा अनादी आहे तसा आत्म्याचा संसारपण अनादी आहे. संसाराला कारणभूत असणारा कर्मसंयोगाला अनादी आहे.