________________
प्रस्तावना
परमशांती अथवा परमआनंद जीवनाचे अंतिम लक्ष्य आहे. त्याला प्राप्त करण्याची साधकाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आकांक्षा असते. पण त्याची पूर्तता भौतिक पदार्थ, सुख, समृद्धी अथवा वैभवाने होऊ शकत नाही. कारण हे सर्व नश्वर आहेत. यात परिणाम सरसता नाही विरसता आहे. भौतिक सुखाच्यामागे दुःख, संयोगाच्या - मागे वियोग लागलेलेच आहे आणि म्हणूनच प्रज्ञाशील पुरुष चिरंतर सुखाच्या शोधात सतत प्रयत्नशील असतात. त्याच्या फलस्वरूपी अध्यात्मदर्शनाचा विकास झाला आहे. परमानंदाचा स्रोत बाह्य जगात नसून अंतर्जगातच आहे. ह्या दिशेने जैन दर्शनाचे आपले विशिष्ट महत्त्व आहे.
जैन धर्माने आणि जैन तत्त्वज्ञानाने विश्वाला आणि विश्वाच्या अध्यात्मिक जगाला अनेक महत्त्वाच्या देणग्या दिल्या आहेत. जैन दर्शनाचा प्रत्येक विचार विश्वाच्या दार्शनिकासाठी विशेष अभ्यास आणि उत्तम जिज्ञासारूप आहे. जैन दर्शन स्थळ, काळ आणि सांप्रदायिकतेच्या सीमेत बद्ध नाही. विश्वाच्या लहानात लहान जीवाच्या कल्याणाची, मांगल्याची शुभभावना जैन दार्शनिकांनी व्यक्त केली आहे. मात्र व्यक्तिगत सुखच नाही तर विश्वाच्या कोणत्याही क्षेत्रात रहाणाऱ्या मानवाच्या परम सुखाची मंगल भावना ही जैन धर्माची जगत् धर्माला दिलेली अजोड संपत्ती आहे. जैन धर्मात दुःखमुक्ती व आनंदप्राप्तीचा जो मार्ग सांगितला आहे तो ज्ञान आणि क्रियामूलक आहे. म्हणूनच "ज्ञान क्रियाभ्यांमोक्षः" असे म्हटले गेले आहे. ज्ञान आणि क्रियेच्या साधनेसाठी जैनागम ग्रंथात आणि तत्संबधित शास्त्रात विस्तृत विवेचन प्राप्त होते.
___ देव, गुरू आणि धर्माच्या कृपेने संसाराच्या त्याग करून, वैराग्य मार्गावर वीतरागदेवाच्या आज्ञेत विचरण करण्याची आणि संयमी जीवन जगण्याची प्रतिज्ञा केली तेव्हापासून सम्यग्ज्ञानाच्या क्षेत्रात कोणते न कोणते ठोस अध्ययन व्हावे अशी माझी भावना होती. कारण 'सम्यग्दर्शन ज्ञान चारित्राणि मोक्षमार्गः' अर्थात सम्यग्दर्शन, सम्यक्ज्ञान व सम्यक् चारित्र हे तीन मोक्षाचे मार्ग आहेत आणि साधकाचे लक्ष्य मोक्ष-प्राप्तीचे असणारच. त्याच दिशेने जास्तीतजास्त प्रगती कशी होईल असे चिंतन करीत असताना संसाराच्या असारतेचा तसेच आत्म्याच्या शाश्वततेचा व अमरतेचा
vediolocession