________________
प्रस्तावना
भारतातील भाषांत प्राकृत भाषांचे स्थान
मानव पृथ्वीवर केव्हा निर्माण झाला ? आणि तो सुरवातीपासून भारतात होता काय ? हे निश्चितपणे सांगता येत नाही. साधारणपणे असे मानले जाते की विभिन्नवंशीय व भिन्नभाषिक मानवजमाती वेळोवेळी बाहेरून भारतात आल्या व येथे राह लागल्या. भारतातील लोक ज्या भाषा बोलतात त्या भाषांचे आर्यभाषा व आर्येतर भाषा असे वर्गीकरण करता येते. त्यांमध्ये आर्यभाषा महत्त्वाच्या आहेत. भारताचा इतिहास, धर्म व तत्त्वज्ञान यांमध्ये त्यांचे कार्य मोलाचे आहे. भारताच्या संस्कृतीशी आर्यभाषा घनिष्ठपणे निगडित आहेत. गेली तीन साडेतीन सहस्र वर्षे आर्यभाषांचा विकास भारतात अत्रुटितपणे चालू आहे. भारतातील आर्यभाषांत प्राकृत भाषांचा समावेश होतो.
आर्यभाषांचा जो अखंड विकास भारतात दीर्घकाल झाला, त्या कालाचे सोईसाठी तीन विभाग केले जातात. (१) प्राचीन (सुमारे इ.स.पू.२५०० ते इ.स.पू.५००) - या काळात वेदकालीन
भाषा व नंतरची संस्कृत भाषा यांचा अंतर्भाव होतो. (२) मध्ययुगीन (सुमारे इ.स.पू.५०० ते इ.स.१०००) - या कालखंडात अनेक
प्रकारच्या प्राकृत भाषा व अपभ्रंश भाषा प्रचलित होत्या. या मध्ययुगाचेही सोईसाठी तीन उपविभाग केले जातात ते असे :(अ) प्रथम (सुमारे इ.स.पू. ५०० ते इ.स. १००) :- या काळात
पालिभाषा, शिलालेखातील प्राकृत इत्यादी प्राकृतांचा वापर होता. (आ) द्वितीय (सुमारे इ.स. १०० ते इ.स. ५००) :- साहित्यात
आढळणाऱ्या माहाराष्ट्री, शौरसेनी, मागधी, पैशाची इत्यादी प्राकृत
या कालखंडात प्रचारात होत्या. (इ) तृतीय (सुमारे इ.स. ५०० ते इ.स. १०००) :- द्वितीय काळातील
प्राकृतांचा विकास होऊन ज्या अपभ्रंश भाषा निर्माण झाल्या, त्या
या काळात वापरात होत्या. (३) अर्वाचीन (सुमारे ई.स.१००० पासून) :- निरनिराळ्या प्राकृत व अपभ्रंश