________________
टीपा
वयस्यानाम् -- वयस्या शब्दाचे अनुक्रमे पं.ब.व. आणि ष.ब.व.
४.३५२ श्लोक १ :- कावळ्याला उडवून लावणाऱ्या (विरहिणी) स्त्रीला
अचानक प्रियकर दिसला. (तिच्या हातातील) अर्ध्या बांगड्या जमिनीवर (गळून) पडल्या आणि (उरलेल्या) अर्ध्या (बांगड्या) तट्दिशी फुटल्या.
__ यातील कल्पना अशी आहे :- आपल्याकडे अशी एक समजूत प्रचलित आहे की घरावर बसून जर कावळा काव काव करीत असेल तर ते ओरडणे पाहुण्याचे आगमन सुचविते. या श्लोकात वर्णिलेली विरहिणी कावळ्याची काव काव ऐकते; पण प्रियकर येत असलेला मात्र तिला दिसत नाही. म्हणून ती (बहुधा) निराशेने कावळ्याला हाकलून लावीत होती. पण तितक्यात अचानक तिला प्रियकर दिसतो. कावळ्याला हाकून लावण्याच्या क्रियेत, विरहावस्थेत कृश झालेल्या तिच्या हातातून निम्म्या बांगड्या गळून जमिनीवर पडल्या. पण प्रियकराला पाहून झालेल्या आनंदाने तिचे शरीर-हातही-फुगले. त्यामुळे उरलेल्या बांगड्या (हाताला लहान होऊ लागल्याने) तड-तड तुटल्या.
या श्लोकात महिहि या स.ए.व. मध्ये 'हि' आदेश आहे. दिट्ठउ -- सू.४.४२९ नुसार दिट्ठ पुढे स्वार्थे अ आला आहे.
४.३५३ येथे सांगितलेल्या इं प्रत्ययापूर्वी नामाचा अन्त्य ह्रस्व स्वर विकल्पाने
दीर्घ होतो (सू.४.३३० पहा). श्लोक १ :- कमळे सोडून भ्रमरसमूह हत्तींच्या गंडस्थळांची इच्छा करतात. दुर्लभ (वस्तु) मिळविण्याचा ज्यांचा आग्रह आहे, ते दूरत्वाचा विचार करीत नाहीत. या श्लोकात उलई या प्र.अ.व. मध्ये आणि कमलई आणि गंडाई या द्वि.अ.व. मध्ये इं आदेश आहे. मेल्लवि -- सू.४.४३९. मेल्ल हा मुच् धातूचा आदेश आहे (सू.४.९१). मह -- हा काङक्ष् धातूचा आदेश आहे (सू.४.१९२). एच्छण -- सू.४.४४१. अलि -- (दे) निबंध, हट्ट, आग्रह.