________________
प्रास्ताविक
१) प्राकृत :
भारतात पूर्वी प्रचलित असलेल्या अनेक भाषांपैकी अर्धमागधी ही एक प्राकृत भाषा होय. 'प्राकृत' या संज्ञेने कोणत्या भाषा निर्दिष्ट होतात याबद्दल भारतीय प्राकृत-वैयाकरणात मतभेद आहेत. माहाराष्ट्री, पैशाची, मागधी व शौरसेनी या प्राकृत असे वररूचि म्हणतो. आर्ष (म्हणजे अर्धमागधी), चूलिका पैशाची व अपभ्रंश या आणखी प्राकृत म्हणून हेमचंद्र मानतो. तथापि माहाराष्ट्री, शौरसेनी, मागधी आणि पैशाची या प्राकृत याबद्दल सर्वांचे एकमत आहे.१ सामान्यतः ‘माहाराष्ट्री, जैन माहाराष्ट्री, अर्धमागधी, मागधी, शौरसेनी, जैन शौरसेनी, पैशाची (उपभाषा-चूलिका पैशाची) अपभ्रंश (उपभाषा-नगर, उपनागर इ.) यांना प्राकृत हे सामान्य नाव दिले जाते. या सर्व प्राकृत भाषात माहाराष्ट्री ही सर्वात महत्त्वाची असल्याने माहाराष्ट्री ही मुख्य प्राकृत मानली जाते.
२) प्राकृत म्हणजे काय?
प्राकृत या शब्दाच्या अर्थाबद्दल विद्वानात दोन पक्ष आहेत :
१) काहींच्या मते, प्राकृत म्हणजे लोकांची मूळची (Original) भाषा. प्रकृति म्हणजे मूळ, काही जण समजतात त्याप्रमाणे प्रकृति-शब्दाने संस्कृत भाषा अभिप्रेत नाही. उलट या प्रकृतीवर संस्कार होऊन संस्कृत भाषा झाली. कारण संस्कृत या शब्दाने संस्कार, सुधारणा, सुव्यवस्थितपणा सूचित होतो. संस्कृत हीच लोकांच्या मूळ-प्राकृत-भाषेतून निर्माण झाली. म्हणजेच सर्वसाधारण जनांच्या ज्या बोलीभाषा त्या प्राकृत होत, त्यावर संस्कार होऊन
१ पिशेल, पृ. १-२ पहा २ वैद्य, पृ. ७ पहा ३ महाराष्ट्राश्रया भाषा प्रकृष्टं प्राकृतं विदुः।। दंडीचा काव्यादर्श ४ वैद्य, पृ. ७; व वैद्य संपादित प्राकृतप्रकाश, प्रस्तावना, पृ. ३ ५ पा. स. म. प्रस्तावना, पृ. ८.९