________________
मराठी भाषेचे अभिजातत्व ('जैन महाराष्ट्री' साहित्याच्या विशेष संदर्भात)
___डॉ. नलिनी जोशी (मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या आवाहनाला अनुसरून लिहिलेला शोधलेख) (१) विश्वातील भाषांचे वर्गीकरण - त्यामध्ये 'प्राकृत' भाषांचे स्थान :
आज उपलब्ध असलेल्या सुमारे २००० मुख्य भाषांना, भाषाशास्त्रज्ञांनी १२ गटांत विभागले आहे. भारतात प्रचलित असणाऱ्या प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक प्राकृत भाषा या बारांपैकी भारोपीय' (इंडो-यूरोपियन)या गटात समाविष्ट होतात. 'भारोपीय भाषा' या सामान्यत: १३ उपगटांत विभक्त केल्या जातात. त्यापैकी एक मुख्य गट 'आर्य भारतीय' (इंडो-आर्यन) भाषांचा आहे. भारतात 'प्राकृत' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भाषा या 'आर्य-भारतीय भाषागटामध्ये समाविष्ट केल्या जातात.
आर्य-भारतीय भाषांचा विचार तीन काळांमध्ये विभागून केला जातो. (१) प्राचीन आर्य-भारतीय भाषाकाळ : इ.स.पू. १६०० ते इ.स.पू. ६०० (२) मध्यकालीन आर्य-भारतीय भाषाकाळ : इ.स.पू. ६०० ते इ.स. १००० (३) आधुनिक आर्य-भारतीय भाषाकाळ : इ.स. १००० ते आजपर्यंत.
मराठी भाषेचे अभिजातत्व सिद्ध करताना, आपल्याला वरीलपैकी दुसऱ्या काळाचा (इ.स.पू. ६०० ते इ.स. १०००) विशेष विचार करावा लागतो. हा काळही भाषाविदांनी तीन गटांत विभागला आहे. त्यापैकी दुसऱ्या गटाचा काळ आहे - इ.स. १०० ते इ.स. ५००. या काळात ज्या विविध प्राकृत भाषांमध्ये साहित्यिक प्रवृत्ती घडल्या, त्यात 'महाराष्ट्री' आणि 'जैन महाराष्ट्री' या भाषांचा समावेश होतो. त्याखेरीज मागधी, अर्धमागधी, पाली, पैशाची आणि शौरसेनी या भाषांमधील साहित्यही उपलब्ध आहे. परंतु आपल्या लेखाचा संबंध महाराष्ट्री' आणि 'जैन महाराष्ट्रशी असल्याने तेवढाच विचार करू.
(२) 'महाराष्ट्री' प्राकृतातील उपलब्ध साहित्य :
येथे नमूद केले पाहिजे की, भरताच्या नाट्यशास्त्रात (सुमारे इ.स.पू. २००) 'महाराष्ट्री' भाषेचा निर्देश नाही. (अध्याय १८, श्लोक ३५-३६) तथापि त्याच्या यादीतील दाक्षिणात्या' या नावाने 'महाराष्ट्री' भाषेचे सूचन होते - असा अनेक अभ्यासकांचा दावा आहे. कारण आजची ‘दाक्षिणात्य' संकल्पना भरतापेक्षा वेगळी आहे. शिवाय त्याने उपभाषांमध्ये द्राविडी' भाषेचा स्वतंत्र निर्देश केला आहे. 'दाक्षिणात्य' या भाषेचे स्पष्टीकरण काही टीकाकार 'वैदर्भी' असे करतात, जो महाराष्ट्राचाच एक भाग आहे. महाराष्ट्री भाषेतील उपलब्ध साहित्य व त्यांचे काळ :
सेतुबंध - प्रवरसेन - इ.स. ५ वे शतक गौडवध - वाक्पतिराज - इ.स. ७५० (८ वे शतक) लीलावती - कौतूहल - इ.स. ८ वे शतक श्रीचिह्नकाव्य - कृष्णलीलाशुक (केरळ-निवासी) - इ.स. १३ वे शतक कंसवध, उषानिरुद्ध - रामपाणिवाद - (मलबार-निवासी)- इ.स. १७-१८ वे शतक
(३) 'महाराष्ट्री' साहित्यातील सातत्य दाखविण्यास 'जैन महाराष्ट्री'ची मदत :
हर्मन याकोबी या जर्मन अभ्यासकाने प्रथमत: ‘जैन महाराष्ट्री' ही संज्ञा वापरली. त्याच्या मते प्राचीन जैन आगमग्रंथ (धर्मग्रंथ) जैन महाराष्ट्री' भाषेत लिहिलेले आहेत. पुढे जैनविद्येच्या अभ्यासकांनी या मताचे खंड करून असे प्रस्थापित केले की सर्वाधिक प्राचीन श्वेतांबर ग्रंथ 'अर्धमागधी' भाषेत असून, इसवी सनाच्या तिसऱ्या