________________
(६) सूत्रकृतांगातील वनस्पतिसृष्टी व सद्यस्थिती व्याख्यान : डॉ. नलिनी जोशी
शब्दांकन : डॉ. अनीता बोथरा
सूत्रकृतांगातील 'आहारपरिज्ञा' अध्ययनात एकेंद्रियांपासून ते पंचेंद्रिय जीवांच्या आहारासंबंधीची चर्चा आहे. त्यातही इतर चार एकेंद्रियांच्या तुलनेने वनस्पती या बऱ्याच प्रमाणात दृश्य व मूर्त स्वरूपात असल्याने व मानवांच्या दृष्टीने त्या अतिशय उपयुक्त असल्याने, वनस्पतींचा विचार सर्वात प्रथम व अधिक विस्ताराने केला आहे. वनस्पतींची उत्पत्ती, वाढ व सजीवता निरीक्षण करण्याजोगी आहे. मानवी शरीराप्रमाणे त्यांच्यातील बदलही आपल्या प्रत्ययास येतात व म्हणूनच जैनग्रंथात वनस्पतिविचार अधिक सखोलपणे व सूक्ष्मपणे केलेला दिसतो.
सूत्रकृतांगात वनस्पतींच्या तीन 'योनि' सांगितल्या आहेत. योनि म्हणजे वनस्पतींचे उत्पत्तीस्थान.
(१) पृथ्वीयोनिक वनस्पती : काही वनस्पतींचा आधार किंवा योनि पृथ्वी असते. पृथ्वीच्या आधाराने वनस्पतींची उत्पत्ती होते. सर्व प्रकारची फळझाडे, सूक्ष्म अशा कुश गवतापासून ते बांबूसारख्या स्थूल गवताचे सर्व प्रकार, आयुर्वेदिक सर्व औषधी वनस्पती व धान्ये, जमिनीलगत वाढणारे शेवाळ इ. छोट्या प्रजाती व गुल्म, गुच्छ इ. झुडपांचे सर्व प्रकार पृथ्वीयोनिक वनस्पती' आहेत.
(२) उदकयोनिक वनस्पती : पाण्यात राहणाऱ्या, पाण्यातूनच आहार घेणाऱ्या व पाण्यातच वाढणाऱ्या वनस्पती 'उदकयोनिक वनस्पती' होत. अवक, पनक, शैवाल, कलम्बूक, हड, कसेरुक इ. उदकयोनिक वनस्पती आहेत. डिसकव्हरीमध्ये अथवा पाण्याखालील सफारीत, अशा प्रकारच्या वनस्पतींचे एक अद्भुत विश्वच पहावयास मिळते. जितकी विविधता पृथ्वीवर नाही त्याहून अधिक विविधता पाण्याखाली पहावयास मिळते. जेवढे रंगांचे वैविध्य दृश्य जगात आहे त्याहून अनेकविध प्रकारच्या खडकांचे रंग व वनस्पतींचे रंग पाण्याखाली पहावयास मिळतात. जैनग्रंथात नोंदविलेल्या तांदळाच्या आकाराच्या छोट्या माश्यापासून ते महाकाय मत्स्यापर्यंतच्या सर्व जाती पाण्याखालीच पहावयास मिळतात. इतके वैचित्र्य समुद्राच्या पोटात आहे. वनस्पतींची विविधताही आहे व त्यांच्या आहाराचे वर्णनही सूत्रकृतांगात केले आहे. पाण्याखालील विश्व काही गूढच आहे.
(३) वनस्पतियोनिक वनस्पती : वनस्पतियोनिक वनस्पती म्हणजे, ‘एक वनस्पती दुसऱ्या वनस्पतीचे उत्पत्तिस्थान असणे.' खोड, फांद्या, पाने, फुले, प्रवाळ, काटे, तुरे इ. सर्व एका मुख्य वनस्पती जीवाचे अध्यारोह आहेत. म्हणजे त्या वनस्पतीच्या आधाराने वाढणारे आहेत. मुख्य झाडाचा जीव एक असला तरी ती वनस्पती जेव्हा स्वत:ला वेगवेगळ्या रूपात रूपांतरित करते तेव्हा खोड, फांद्या इ. सुद्धा वेगवेगळे स्वतंत्र-स्वतंत्र जीव होतात. माणूस एकच असला तरी त्याच्या केस, त्वचा, हाडे, मांस, रक्त इ. सर्व अवयवांच्या पेशींची मूळ रचना वेगवेगळी असते. त्याचप्रमाणे वनस्पतिशास्त्राच्या दृष्टीनेही खोड, पान इ.च्या पेशी वेगवेगळ्या असतात. याच अर्थाने प्रत्येक पाना-फुलाचा जीव वेगळा असतो असे जैनशास्त्र म्हणते. बागकाम करताना लक्षात आलेले विशेष निरीक्षण येथे नोंदवावेसे वाटते. जास्वंदीच्या फुलांचे दिवस होते. निरीक्षणानंतर असे लक्षात आले की, फांदीला १-२ फुलेयेणार असतील तर १०-१२ पाने गळूनच पडतात. फुले येण्यासाठी पानांना आपला प्राण त्याग करावा लागतो. 'परस्परोपहो जीवनाम्' या जैनग्रंथात नमूद केलेल्या सूत्राप्रमाणे प्रत्येक जीव दुसऱ्या जीवाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे अयोगी पडतच असतो. विशेष म्हणजे फांदीला ज्या क्रमाने पाने येतात, त्या क्रमाने गळत नाहीत. अनुभव असा आहे की, कित्येकदा जून पान तसेच राहते व नवीन, छोटे, कोवळे पान गळून जाते. त्याअर्थी जैनग्रंथात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पानात स्वतंत्र जीव आहे व त्यामुळे प्रत्येक पानाचा जीवनकाळही त्याच्या त्याच्या आयुष्यकर्मानुसार वेगवेगळा आहे. म्हणूनच प्रत्येक पाना-फुलाला वेगवेगळ्या प्रकारे कर्मसिद्धांत लागू होतो.
प्रत्येक झाडाचे जीवनचक्र वेगळे असते. प्रत्येक झाडाची पानगळती वेगळी असते. पद्धत वेगळी. वेळ