________________
दशलक्षण पर्व चिंतन ५
—
डॉ. नलिनी जोशी
आपण जो घरसंसार करत असतो तेवढाच संसार आपल्याला माहीत असतो. पण कुन्दकुन्द नावाचे आचार्य, पाच प्रकारच्या संसारांचा असा काही भव्य पट उलगडून दाखवतात की जणू 'गूगल'वर जाऊन समग्र विश्वस्वरूपाचं दर्शन करून आल्यासारखं भासतं.
बारा अनुप्रेक्षा अर्थात् चिंतनातील पाचवा मुद्दा आहे 'संसार'. हा संसार दाट व अफाट जंगलासारखा आहे. सर्व संसारी जीव चकवा लागल्यासारखे वाट हरवून या जंगलात फिरत आहेत. भांबावून गेले आहेत. साक्षात्क पुरुषांकडून मार्गदर्शन, ज्ञान घेतले नाही तर असेच फिरत राहू.
संसार पाच प्रकारचा आहे. पहिला आहे द्रव्यसंसार. या विश्वात अनंतानंत असे पुद्गल-परमाणू व त्यांचे लहान-मोठे स्कंध आहेत. जन्म-मरण-संसरणाच्या या प्रचंड प्रवासात हे अस्तित्वात असलेले परमाणू आणि स्कंध मी क्रमाक्रमाने अनेकदा ग्रहण केले आहेत, भोगले आहेत, त्यागले आहेत. प्रत्येक परमाणूवर अलग-अलग वर्ण, रूप, रस, गंध, स्पर्श आहेत. त्यांचा कितीही भोग घेतला तरी पुरेसे वाटत नाही. भोगातून कर्मबंध आणि कर्मबंधातून भोग - असं हे दुष्टचक्र म्हणजेच द्रव्यसंसार.
आता क्षेत्रसंसाराचा पसारा पाहू या. या त्रैलोक्यात एकही क्षेत्र मी असे सोडलेलं नाही की जिथं मी जन्ममरण केलेले नाही. माझा आत्मा अगर जीव, लहान-मोठी शरीरे धारण करून सर्व क्षेत्रांना स्पर्श करीत संसरण करत हाच क्षेत्रसंसार !
कालसंसार आणखीच विलक्षण आहे. कालचक्र अखंड वर्तुळाकार आहे. सोयीसाठी 'युगे' वगैरे त्याचे भेद केले तरी अपकर्षकाल- उत्कर्षकाल असे त्याचे 'रोलर कोस्टर' अखंड चालू आहे. कालाचा सर्वात सूक्ष्म अंश म्हणजे 'समय'. तो एका सेकंदापेक्षाही कितीतरी सूक्ष्म आहे. समयांच्या पंक्तींमध्ये हा माझा जीव क्रमाने असंख्य वेळा जन्मला आहे, मरणही पावला आहे.
चौथा संसार आहे ‘भवसंसार'. भव म्हणजे गती. गती चार आहेत. देव, मनुष्य, नरक आणि तिर्यंच. या चारही गतीत कर्मानुसार गमन करून क्रमाक्रमाने फिरत रहाणे हाच भवसंसार.
पाचवा संसार हा ‘भावसंसार' आहे. भावसंसार म्हणजे कर्मसिद्धांताला अनुसरून केलेलं परिभ्रमण आहे. शरीराच्या संपर्कात आलेला आत्मा अनेक कषाय, विकार, भावभावनांनी युक्त होत असतो. त्यांची तीव्रता-मंदा कमीजास्त असते. त्यानुसार आपण काया-वाचा-मनाने शुभ-अशुभ कर्मे करीत राहतो. त्याचे फळ म्हणून वारंवार जन्म घेत रहातो. हे चक्र अखंड फिरतच रहाते. ते भेदण्याचा प्रयत्न करणारे अगदी विरळाच असतात.
हे पाच प्रकारचे संसार सुटे सुटे नाहीत. एकमेकात अडकवलेल्या कड्यांप्रमाणे एकमेकांच्या आधारानं फिरणारे आहेत. ज्यांनी मोक्षप्राप्ती करून घेतली त्यांनी त्या पाचही चक्रातून अचूक लक्ष्यवेध करून ध्येय गाठले. पाचही संसारांचे स्वरूप जाणून घेणं आवश्यक आहे कारण त्याशिवाय आपण काय टाळायचं आहे ते आपल्याला समजणार नाही.
**********