________________
७८
पैशांचा व्यवहार
दादाश्री : लोभ! लोभ कितीतरी जन्मापर्यंतसोबत राहतो. लोभी मनुष्य प्रत्येक जन्मात लोभीच राहतो, म्हणजे त्याला तसे पसंतच असते!
प्रश्नकर्ता : करोडो रुपये गाठीशी असताना सुद्धा धर्मात पैसा देऊ शकत नाही, याचे काय कारण?
दादाश्री : बांधलेले बंध सुटणार तरी कसे? त्यामुळेच त्याची सुटका होत नाही आणि बांधलेलाच राहतो. स्वतः खात पण नाही. अरे, पण कुणासाठी साठवून ठेवतो?! पूर्वी तर साप होऊन फिरत होते. जे धन जमिनीत गाढून ठेवत असत ना, त्या धनाच्या रक्षणासाठी तिथे साप होऊन फिरत राहायचे. 'माझे धन! माझे धन' करत!
जीवन जगता आले, असे कुणाच्या बाबतीत म्हणता येईल? तर जवळ असलेला पैसा दुसऱ्यांसाठी लुटवून टाकतो. त्याला खरे जीवन जगता आले असे म्हणता येईल. वेडेपणाने उधळणे नव्हे, तर समजपूर्वक जो दुसऱ्यांच्यासाठी
ओवाळून टाकतो. वेड्यासारखे दारु वगैरे पित असतात, त्यात काही भलं होत नाही. कोणतेही व्यसन नसेल आणि परक्यांसाठी स्वत:चे लुटवून टाकतो. यांना पाहा, हे लुटवत आहेत ना. यास पुण्यानुबंधी पुण्य म्हणतात.
पुण्यानुबंधी पुण्य कशास म्हणतात? कोणत्याही क्रियेत ज्याला काही मोबदल्याची, इच्छा नाही ते पुण्यानुबंधी पुण्य. दुसऱ्यांना सुख देत असताना मोबदल्याची अपेक्षा ठेवत नसेल, त्याला म्हणतात पुण्यानुबंधी पुण्य !
प्रश्नकर्ता : पैसे सोबत घेऊन जायचे असेल तर कसे घेऊन जाता येतील?
दादाश्री : त्यासाठी तर एकच मार्ग आहे की, जे आपले नातेवाईक नाहीत, अशा परक्यांच्या जीवनात शांती, संतोष दिला असेल, तर सोबत येईल. नातेवाईकांना सुख-शांती दिली तर ते सोबत येत नाही, पण आपला हिशोब चुकता होतो.
किंवा आमच्यासारख्यांना विचारले तर लोकांना हितकारी होईल असे ज्ञानदान आम्ही सूचवू शकतो. चांगली पुस्तके छापून लोकांना दिली तर त्यांच्या वाचनाने कितीतरी माणसं सन्मार्गी लागतील. आम्हाला विचारले तर आम्ही सांगतो. आम्हाला देणे-घेणे नसते.