________________
४६
गुरु-शिष्य
प्रश्नकर्ता : असे समर्पण तर, श्रीकृष्ण भगवंत किंवा महावीर भगवंतांच्या तोडीचे असतील तरच ते समर्थ म्हटले जातील ना? की मग कोणत्याही साधारण व्यक्तीला समर्पण केले तरी चालेल?
दादाश्री : ते तर तुम्हाला असे विराट पुरुष वाटले तर करावे. तुम्हाला वाटेल की हे महान पुरुष आहेत, त्यांची सर्व कार्ये अशीच विराट वाटली, तर आपण त्यांना समर्पण करावे.
प्रश्नकर्ता : जे महान पुरुष होऊन गेलेत, म्हणजे जे हजारो वर्षांपूर्वी होऊन गेले आहेत, त्यांना आपण समर्पण केले तर त्यास समर्पण केले असे म्हणता येईल? त्यामुळे आपली प्रगती होईल का? की मग प्रत्यक्ष महापुरुषच हवेत?
दादाश्री : परोक्षापासून सुद्धा प्रगती होते आणि प्रत्यक्ष जर भेटले तर लगेचच कल्याण होऊन जाईल. परोक्ष, प्रगतीचे फळ देते आणि प्रत्यक्षाशिवाय कल्याण होत नाही.
समर्पण केल्यानंतर आपल्याला काहीच करावे लागत नाही. आपल्याकडे बाळ जन्माला आल्यानंतर बाळाला काहीच करावे लागत नाही, त्याचप्रमाणे समर्पण केल्यावर आपल्याला काहीच करावे लागत नाही.
तुम्ही ज्यांना समर्पणबुद्धी करता, तेव्हा त्यांच्यात जी शक्ती असेल ती शक्ती तुम्हालाही प्राप्त होते. ज्यांना समर्पण केले त्यांचे सर्व आपल्याला प्राप्त होते. जसे एका टाकीला दुसरी टाकी पाईपने जोडली तर, त्या एका टाकीमध्ये वाटेल तेवढा माल भरला असेल पण दुसऱ्या टाकीमध्ये तेवढीच लेव्हल (पातळी) होऊन जाते. समर्पण भावाचेही असेच आहे.
ज्यांचा मोक्ष झाला आहे, जे स्वतः मोक्षाचे दान देण्यास निघाले आहेत, तेच मोक्ष देऊ शकतात. तसेच आम्ही मोक्षाचे दान देण्यास निघालो आहोत. आम्ही मोक्षाचे दान देऊ शकतो. नाही तर कोणी मोक्षाचे दान देऊ शकत नाही.
प्रश्नकर्ता : सद्गुरू हे 'रिलेटिव्ह' नाहीत का?