________________
गुरु-शिष्य
'ज्ञानीपुरुष' निमित्त आहेत आणि तुमचे उपादान आहे. उपादान कितीही तयार असेल पण ज्ञानीपुरुषाच्या निमित्ताशिवाय कार्य होणार नाही. कारण आध्यात्मिक विद्या हे एकच कार्य असे आहे की ते निमित्ताशिवाय प्रकट होत नाही. निमित्ताशिवाय प्रकट होत नाही असा माझा बोलण्याचा भावार्थ आहे पण तो नव्याण्णव टक्के एवढाच आहे, एक टक्का त्यात सुद्धा सूट असते. निमित्ताशिवाय सुद्धा प्रकट होत असते. परंतु तो नियम मानला जात नाही, त्याला नियमात बसवले जात नाही. नियमाप्रमाणे तर निमित्तानेच प्रकट होते. अपवाद ही वेगळी गोष्ट आहे. नियमाला नेहमी अपवाद असलाच पाहिजे, तरच त्यास नियम म्हटले जाते.
मग त्यात लोक कुठपर्यंत घेऊन गेले की 'सगळ्या वस्तू वेगवेगळ्या आहेत, एक वस्तू दुसऱ्या वस्तूसाठी काहीच करू शकत नाही.' त्याच्याशी यास जोडून दिले. त्यामुळे त्यांना असेच वाटते की कोणी कोणासाठी काही करू शकत नाही.
प्रश्नकर्ता : लोक असेच म्हणतात की कोणी कोणासाठी काही करू शकत नाही.
दादाश्री : हे वाक्य तर भयंकर चुकीचे आहे.
प्रश्नकर्ता : शास्त्रात असे म्हटले आहे की कोणी कोणासाठी काही करू शकत नाही, ते काय आहे ?
दादाश्री : ती तर वेगळीच गोष्ट आहे. शास्त्र वेगळेच सांगू इच्छितात आणि लोक समजतात वेगळेच! चोपडण्याचे औषध पितात आणि मरून जातात, त्याला कोण काय करणार? त्यात मग डॉक्टरांचा काय दोष?
जर कोणी कोणासाठी काहीच करू शकत नाही, असे असते तर, वकील कामी आलेच नसते ना! हे डॉक्टर कामी आलेच नसते ना! बायकोही कामी आली नसती! पण हे सगळे तर एकमेकांच्या कामी येतात.
प्रश्नकर्ता : कोणी कोणासाठी काही करू शकत नाही ही जी गोष्ट लिहिली आहे, ती कुठल्या संदर्भात लिहिली गेली आहे ?