________________
गुरु-शिष्य
दादाश्री : परंतु त्यांनी मदत घेतली होती, त्यांनी दोन-तीन जन्मांपूर्वी गुरूंची मदत घेतली होती. मदत घेतल्याशिवाय कोणीही मुक्त झालेला नाही. यात सुद्धा निमित्त तर होतेच. हे तर ऋषभदेवांच्या जन्मात लोकांनी असे पाहिले की त्यांनी स्वत:ची बंधने स्वतःच तोडली. परंतु स्वतःच स्वत:चे करू शकेल असे घडत नाही, कोणाकडून असे कधी घडलेही नाही आणि घडणारही नाही. अर्थात निमित्त असावेच लागते, नेहमीच.
प्रश्नकर्ता : महावीर स्वामींचे गुरू कोण होते?
दादाश्री : पूर्वी महावीर स्वामींचेही बरेच गुरू झाले होते. परंतु शेवटच्या दोन-तीन जन्मात कोणी गुरू नव्हते. तेव्हा हा काही असेच लाडू खाण्याचा खेळ आहे का? तीर्थंकरांना शेवटच्या अवतारात गुरूंची गरज भासत नाही.
गुरूची गरज कुठपर्यंत? प्रश्नकर्ता : एकलव्याने गुरू नसताना सुद्धा सिद्धी प्राप्त केली होती, तर काय हे शक्य नाही?
दादाश्री : एकलव्याने जी सिद्धी प्राप्त केली ती एक्सेपश्नल आहे, अपवाद आहे. तो नेहमीचा नियम नाही. प्रत्येक नियमाचे अपवाद असू शकतात. शेकडा दोन-पाच टक्के असे सुद्धा घडू शकते. पण म्हणून आपण असे मानू नये की हाच नियम आहे. या जन्मात जरी गुरू नसतील पण या पूर्वीच्या जन्मात गुरू भेटलेलेच असतात!
प्रश्नकर्ता : एकलव्याला गुरू द्रोणांनी शिकवले नाही आणि तो गुरूंच्या मूर्तीजवळ बसून शिकला!
दादाश्री : ते सर्व त्याने मागील जन्मात शिकलेले होते. मूर्ती तर आत्ता निमित्त बनली. गुरू तर प्रत्येक जन्मात पाहिजेच.
प्रश्नकर्ता : मग आपण असे म्हणू शकतो की 'मागील जन्मात माझे जे गुरू होते तेच आता माझे सर्व करतील.' मग या जन्मात गुरू करण्याची आवश्यकता आहे का?