________________
१२६
गुरु-शिष्य
दादाश्री : मग कशाच्या नावावर ढोंग चालवतील? दुसऱ्या नावावर ढोंग करायला गेले तर लोक मारतील. बापजीने दहा रुपये घेतले पण जर त्यांच्यावर कोणी आरोप केला आणि बापजीनी श्राप दिला तर काय होईल? म्हणून धर्माच्या नावाशिवाय दुसरी काही पळवाटच नाही आणि सटकण्याची दुसरी कुठली जागाच नाही.
तरी पण सगळेच असे आहेत असे म्हणू शकत नाही. यांच्यात पाच-दहा टक्के खूप चांगला माल आहे ! परंतु तिथे कोणी जातच नाही, कारण त्यांच्या वाणीत वचनबळ नसते आणि त्या दुसऱ्या गुरूची वाणी तर डोळे दिपवून टाकेल अशी असते, म्हणून सर्व तिथे जातात. पण त्यांची भावना वाईट असते, कसेही करून पैसे लुबाडणे, अशी भावना असते. या धुर्तांच्या दुकानातून काय घ्यायचे? आणि जी चोख-प्रामाणिक दुकाने आहेत तिथे माल नसतो मग तिथून काय घेणार? चोख-प्रामाणिक माणसाच्या दुकानात माल नाही. धुर्तांच्या दुकानात तोलून माल जास्त दिला जातो, परंतु तो भेसळयुक्त माल असतो.
परंतु जिथे कोणत्याही प्रकारची गरज नसते, पैशांची गरज नसते, स्वत:च्या आश्रमाचा विस्तार करण्याची किंवा स्वतःचे नाव कमावण्याची गरज नसते, अशी माणसे असतील तर गोष्ट वेगळी आहे. असा मनुष्य एक्सेप्टेड (स्वीकार्य) आहे. अशा दुकानास जरी दुकान म्हटले तरी पण तिथे लोकांना लाभ मिळतो. मग तिथे ज्ञान नसेल तरीही हरकत नाही, परंतु लोक निर्मळ असले पाहिजेत, प्योर असले पाहिजेत. ईम्प्योरिटी (मलिनते) मुळे कोणी कधीच काही प्राप्त करू शकत नाही.
अप्रतिबध्दपणे विचरतात ते ज्ञानी प्रश्नकर्ता : हिंदु समाजात, जैन समाजात आश्रम पद्धती आहे. ती बरोबर आहे की नाही?
दादाश्री : ती पद्धत सत् युगात ठीक होती, म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या, या दोन आऱ्यांमध्ये ठीक होती. पाचव्या आयत आश्रम पद्धती ठीक नाही.