________________
३८
वाणी, व्यवहारात...
प्रश्नकर्ता : तर त्याला काही नुकसान होत नाही?
दादाश्री : नुकसान तर आहे, परंतु पुढच्या जन्माचे. या जन्मात तर त्याला मागच्या जन्माचे फळ मिळाले. आणि हे खोटे बोलला, त्याचे फळ त्याला पुढच्या जन्मात मिळेल. आता हे त्याने बी पेरले, बाकी हे काही अनागोंदी कारभार नाही की वाटेल तसे चालून जाईल!
प्रश्नकर्ता : जाणून-बुजून चुकीचे केले आणि नंतर प्रतिक्रमण करून घेऊ असे म्हटले, तर ते चालेल?
दादाश्री : नाही. जाणून-बुजून तर करू नये. पण त्यातून जर चुकीचे झाले तर प्रतिक्रमण करून घ्यावे.
प्रश्नकर्ता : दुसऱ्याच्या भल्यासाठी खोटे बोलणे हे पाप मानले जाईल?
दादाश्री : मुळात खोटे बोलणे हेच पाप मानले जाते. तरी दुसऱ्याच्या भल्यासाठी बोललो तर एकीकडे पुण्य बांधले आणि दुसरीकडे पाप बांधले. म्हणजे यात थोडे-फार पाप तर आहे.
खोटे बोलल्याने काय नुकसान होत असेल? तर त्यामुळे आपल्या वरचा विश्वास उडतो. आणि विश्वास उडाला म्हणजे माणसाची किंमत खलास!
प्रश्नकर्ता : आणि खोटे पकडले जाते तेव्हा काय अवस्था होते?
दादाश्री : आपण सांगायचे ना की, 'पकडले गेले आमचे' आणि मी तर तेव्हा सांगूनच टाकतो की 'भाऊ, मी पकडलो गेलो.' त्यात काय अडचण आहे ? नंतर तोही हसेल आणि आपणही हसायचे. त्यामुळे तो समजून जातो की यात काही घेणे-देणे नाही, आणि नुकसान होईल असेही नाही.
प्रश्नकर्ता : समजा की आमचे खोटे तुम्ही पकडले, तर तेव्हा तुम्हाला कसे वाटते?